मुखेड तालुक्यातील ग्रामीण भागात अधिकतर भाग हा डोंगराळ भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती, फुले, वेली व फळांच्या स्वरूपात आढळतात; मात्र सध्या शेतीसाठी तणनाशक फवारणी केली जात आहे. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांतून शेतात किंवा शेताच्या बांधावर किंवा बाजूच्या परिसरात उगवणारी रानभाजीही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
पावसाळ्यात शेतात उगवणाऱ्या पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या पालेभाज्या, रानभाज्या या तणनाशकाच्या फवारणीने नामशेष होऊ लागल्या आहेत. पावसाळा आला की येथील नागरिकांना रानभाजीचे वेध लागतात. अंबाडी, तरोटा, करटोली याची चव आजही जुने लोक विसरले नाहीत. बहुतांश नवीन व शहरी पिढीला या राजभाज्या माहीत नाहीत. शेतीवरील मजुरी खर्च कमी करण्याकरिता व मजुरांची वाढती टंचाई लक्षात घेता शेतात तणनाशक फवारणी करण्यात येत आहे. परिणामी, रानभाज्या दुर्मीळ झाल्या आहेत.
शेतकरी शेतात तण नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात तणनाशक फवारणी करतात. ज्यामुळे शेतातील रानभाज्या नामशेष होत आहेत. पूर्वी मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवत असत. आता मात्र हे प्रमाण कमी झाले आहे. याशिवाय मार्केटमध्ये या भाज्यांना पर्यायी भाज्या म्हणून उपलब्ध असलेल्या अंबाडी, करटुले यांना रानातील अंबाडीसारखी चव नसते. शासनाने शेतीला रोजगार हमीची जोड दिल्यास शेतीमध्ये तण नियत्रंणासाठी शेतकऱ्यांना मजूर मिळेल.
रानभाज्या वाचवल्या नाही तर नामशेष होतीलरानभाज्या जर शेतकऱ्यांनी वाचवल्या नाहीत तर त्या नामषेश होतील. त्यामुळे भावी पिढीला या भाज्या कशा होत्या याची माहितीसुद्धा नसेल. त्यामुळे या पिढीसाठी तसेच येणाऱ्या पिढीसाठीसुद्धा रानभाज्या वाचवणे आवश्यक आहे. हंगामानुसार रानभाज्या खाणे हे आरोग्यासाठी हितकारक असते. - साधू पाटील, शेतकरी, राजुरा बु.
फवारणी करताना ठरावीक मात्रा देणे गरजेचेस्थानिक पावसाळ्यात शेतात उगवणाच्या आंबाडी, करटुले, अळूची पाने, तरोटा, माठ आदी रानभाज्या पावसाळ्यातील जेवणाची लज्जत वाढवतात. त्यामुळे कोणतीही फवारणी करताना ठरावीक मात्रा देणे गरजेचे आहे. - विनोद जोशी, कृषी सहायक