वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २० लाखांपर्यंत मदत दिली जाते. तसेच वन्यप्राण्यांनी शेतीचे नुकसान केल्यास मदत दिली जात आहे. त्यासाठी वनविभाग कार्यालयाकडे वेळेवर अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी विशिष्ट कालावधी दिला आहे, त्यानंतर ही मदत देऊ केली जाते. मागील तीन वर्षाच्या कालावधीत अनेक शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली आहे.
पिके बहरात आली असताना पिकांचे नुकसान झाल्यास संबंधित शेतकऱ्यास मोठा आर्थिक फटका बसतो. यासोबतच वन्यप्राण्यांनी हल्ला केल्यास शेतकरी गंभीर जखमी किंवा बहुतांश वेळा मृतदेखील होतो. अशावेळी शेतकऱ्यांना कमी कालावधीत मदत मिळणे अपेक्षित आहे. वनविभागाकडे वेळेवर अर्ज केल्यास मदत दिली जाते. वनविभागाने यासाठी नियमावली बनविली आहे.
रोही, रानडुकरांचा शिवारात हैदोस, शेतकरी वैतागले; वन विभागाची गस्त गेली कुठे?
५२५ शेतकऱ्यांना ६७ लाखांची मदत मागील तीन वर्षाच्या कालावधीत बीड जिल्ह्यातील विविध भागांत वन्य जीवांनी शेतकऱ्यांवर, पशुधनावर हल्ले केले, पिकांचे नुकसान केले. भरपाई म्हणून वनविभागाने जिल्ह्यातील ५२५ शेतकऱ्यांना ६७.३२ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
पूर्वी वन्यप्राणी हल्ला व शेती नुकसानीसाठी कमी मदत दिली जात होती. परंतु ऑगस्ट २०२२ पासून त्यात वाढ झाली असल्याने नवीन नियमानुसार मदत दिली जात आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात आहे. वनविभागाकडे अर्ज आल्यास तत्काळ कारवाईला सुरुवात केली जाते. अनेक प्रकरणे मदतीस पात्र असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्राप्त होते. वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य हानी तसेच पशुधनाचा मृत्यू झाल्यास मदत दिली जाते.
घटनेनंतर ४८ तासांत कळविणे आवश्यक
हल्ला झालेल्या व्यक्तीने अथवा त्यांच्या नातेवाइकांनी हल्ला झाल्यापासून ४८ तासांत नजीकच्या वन अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला कळविणे आवश्यक आहे.
पीक नुकसान झाल्यास किती मदत?
जिल्ह्यातील पाटोदा, बीड, गेवराई या तालुक्यांत रानडुकरांचा त्रास शेतकऱ्यांना आहे. पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतीचा पंचनामा करून किती नुकसान झाले आहे, त्या आधारावर आर्थिक मदत दिली जाते.
हल्ल्यात मृत्यू झाल्यास २० लाखांपर्यंत मदत
शेतकरी किवा सामान्य व्यक्त्ती वन्य जीवांच्या हल्ल्यात मृत झाल्यास २० लाख रुपये दिले जातात. १० लाख रुपये धनादेशाद्वारे तर १० लाख रुपये राष्ट्रीयीकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये जमा केले जातात. अपंग झाल्यास ५ लाख रुपये, व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास १ लाख २५ हजार, किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च दिला जातो.