Join us

कोरडवाहू व कृषी हवामानशास्त्र तंत्रज्ञानातून शेतकरी साधतील का प्रगती? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 4:37 PM

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्राला राष्ट्रस्तरीय समितीने दिली भेट देऊन मार्गदर्शन केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती व कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्पाला शुक्रवारी कोरडवाहू पंचवार्षिक शेतीच्या राष्ट्रस्तरीय पंचवार्षिक पुनरावलोकन व मूल्यमापन चमूने भेट देऊन येथील चालणाऱ्या कामाची पाहणी केली.

यावेळी आयोजित चर्चासत्रात कोरडवाहू शेती संशोधन, कोरडवाहू व कृषी हवामानशास्त्र तंत्रज्ञान, आदी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा या विषयावर चर्चा करण्यात आली. 

कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. रवींद्र चारी यांनी कोरडवाहू शेती व कृषी हवामानशास्त्र प्रकल्पांतर्गत भारतामध्ये सुरू असलेल्या संशोधनाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला कोरडवाहू शेतीचे सर्व शास्त्रज्ञ, तसेच कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र काळबांडे, तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी यांची उपस्थिती होती.

राष्ट्रीय स्तरावरील पंचवार्षिक पुनरावलोकन चमूने शुक्रवारी(१३ सप्टेंबर) रोजी आपोती व घुसर, येथील शेततळे असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रास भेट दिली. या वेळी शेतकऱ्यासोबत चर्चा करून शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीसंबंधी तंत्रज्ञान अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. 

या भेटीदरम्यान सदर चमूने वरखेड, ता. बार्शीटाकळी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय हवामान संवेदनक्षम शेतीवर आधारित राष्ट्रीय अभिनव प्रकल्पातील लाभार्थी शेतकरी गजानन कोंदणकार, दिगंबर कोंदणकार, प्रकाश डांगे, सहदेव टोपले व महादेव डांगे यांच्या प्रक्षेत्रांना भेटी दिल्या. 

कोरडवाहू शेतीचे तंत्रज्ञान बीबीएफ व शेततळे तंत्रज्ञान, आंतरपीक पद्धती, जल व मृद संधारण पद्धती यांचा अवलंब केल्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या लाभाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पंचवार्षिक पुनरावलोकन व मूल्यमापन चमूने गाव आळंदा, ता. बार्शीटाकळी येथे कार्यान्वित कोरडवाहू एकात्मिक शेती पद्धती प्रकल्प प्रात्याक्षिकांना सुद्धा भेटी दिल्या.

टॅग्स :शेती क्षेत्रअकोलाकृषी विज्ञान केंद्रशेतकरीशेती