बापू सोळंके
छत्रपती संभाजीनगर यंदाचा मराठवाड्यातील पावसाळा अनियमित आणि अत्यल्प झाल्याचा परिणाम रब्बी हंगामावर होणार आहे. आतापर्यंत आपल्या जिल्ह्यात केवळ आठ टक्के पेरणी झाली आहे. कमी पावसामुळे यंदा रब्बीज्वारीचे क्षेत्र वाढणार आहे आणि गव्हाचे कमी होणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
बियाणे, खताचा मुबलक साठा उपलब्ध
कृषी विभागाने मागील पाच वर्षांच्या जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची सरासरी पाहून यावर्षीही सुमारे अडीच ते तीन लाख हेक्टरवर रब्बी हंगामात पेरणी होईल, असा अंदाज वर्तविला होता. यानुसार शासनाने आपल्या जिल्ह्यासाठी बियाणे आणि खताचा साठा उपलब्ध केला आहे. तर उपलब्ध साठ्याच्या तुलनेत मागणी नसल्याने जिल्ह्यात आज सुमारे १ लाख ६७ हजार मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहे. शिवाय सर्व प्रकारचे बियाणेही उपलब्ध आहे.ज्वारीचे क्षेत्र दुप्पट होणार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दरवर्षी सुमारे अडीच लाख हेक्टरवर रब्बी हंगामात विविध पिकांची पेरणी होत असते. त्यानुसार कृषी विभागाने रब्बी हंगामाचे नियोजन करताना अडीच लाख हेक्टरवर आवश्यक बियाणे आणि खतांची मागणी शासनाकडे नोंदविली होती. त्यानुसार जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा आणि बियाणे असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
कमी पावसाचा फटका
चालूवर्षी अत्यल्प पाऊस पडल्याचा विपरित परिणाम रब्बी हंगामावर झाला आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत रब्बीचे क्षेत्र निम्मे होण्याचे संकेत आहेत. जमिनीत ओल नसल्याने शेतकरी रब्बी हंगाम घेण्याचे टाळत आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे बारा महिने सिंचनाची सुविधा आहे, अशा शेतकयांनी रब्बीची पेरणी सुरु केली आहे. जिल्ह्यात खते आणि बियाण्यांचा मुबलक साठा आहे. -प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक
यंदा अडीच लाख हेक्टरचे नियोजन
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे गव्हाऐवजी शेतकरी रब्बी ज्वारी पेरणीला प्राधान्य देत असल्याचे दिसत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ज्वारीचे क्षेत्र दुप्पट होणार असल्याचे कृषी विभागाच्या उच्चपदस्थ सुत्रांनी सांगितले.