Join us

हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी शासन करणार का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 5:45 PM

यंदाच्या हंगामात सोयाबीन, कापासाची हमीभावात खरेदी होणार का? शासन काय निर्णाय घेणार वाचा सविस्तर

नागपूर :

आमच्या सोयाबीन, कापसाची हमीभावात खरेदी व्हावी. त्यांना अधिक दर मिळावा यासाठी आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील ड्यूटी वाढवा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली होती.  त्यांनी शेतकरी हितासाठी तत्काळ निर्णय घेतला.

त्याचा परिणामही दिसू लागला आहे.  सोयाबीनचे दर वाढले. या हंगामात हमीभावापेक्षा अधिक दराने सोयाबीन आणि कापसाची खरेदी होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

शनिवारी (२१ सप्टेंबर) रोजी नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, आमच्या सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यंदाच्या हंगामात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे या हंगामात सोयाबीन आणि कापसाची खरेदी ही हमीभावात केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार रुपये महिन्याला देत आहोत. यासोबतच लखपती दीदीही तयार होत आहेत. इतक्या वर्षांत आमच्या लोहार, सुतार, कुंभार, सोनार, मूर्तिकार, चर्मकार, मिस्त्री, न्हावी, टेलर, धोबी यांचा यापूर्वीच्या सरकारने कधीही विचार केला नाही.

या बारा बलुतेदारांचा, मायक्रो ओबीसींचा विचार केला नाही. या सर्वांचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पीएम विश्वकर्मा योजनेतून त्यांना प्रशिक्षण दिले.  त्यांचा रोजगार वाढविता यावा म्हणून अर्थसाहाय्य दिले, त्यांचे जीवन बदलविले, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनकापूसशेतकरीशेती