Join us

निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा निर्णय! १० वर्षापूर्वीच्या फळबाग नुकसानीसाठी पंचनाम्याची अट वगळण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 7:06 PM

फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमीनीचे नुकसान झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना ३ महिन्यांची व्याजमाफीची रक्कम पंचनामे उपलब्ध असण्याच्या अटीवर शासनामार्फत अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Maharashtra Farmer Crop Damage : राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर प्रलंबित पीक विमा, अनुदान, व्याज, योजनांसाठी निधीचे वितरण असे अनेक निर्णय घेतले. तर त्यातच सरकारने तब्बल १० वर्षांपूर्वी म्हणजे २०१५ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसान झालेल्या फळबागांना व्याजमाफी देण्यासाठी पंचनाम्याची अट वगळली आहे. या शेतकऱ्यांना या व्याजमाफीसाठी तब्बल १० वर्षापर्यंत वाट पहावी लागली असून निवडणुकीच्या तोंडावर सरकारला सुचलेले हे शहाणपण आहे. 

दरम्यान, फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमीनीचे नुकसान झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना ३ महिन्यांची व्याजमाफीची रक्कम पंचनामे उपलब्ध असण्याच्या अटीवर शासनामार्फत अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही अट विचारात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील ६५२ पात्र खातेदारांना ५५ लाख ८२ हजार रूपयांची व्याजमाफी देण्यात आली आहे.

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे आंबा बागायतीचे २४ हजार ७४४ हेक्टर आणि काजु बागायतीचे १३ हजार ५४३.६५ हेक्टर असे ८७ हजार ३६१ शेतकऱ्यांचे एकूण ३८ हजार २८७.६९ हेक्टर क्षेत्राचे ५०% पेक्षा जास्त नुकसान झाले होते. तर शासनाने घेतलेल्या व्याजमाफीच्या निर्णयाचा लाभ या शेतकऱ्यांना पंचनाम्याविना मिळणार नव्हता.

दरम्यान, फळबागांचे नुकसान झालेल्या या कर्जदार शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ मिळणे आवश्यक होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ८७ हजार ३६१ शेतकऱ्यांचे नुकसान न होण्यासाठी राज्य सरकारने व्याजमाफीसाठी पंचनाम्याची अट वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार केवळ ३ महिनांच्या व्याजमाफीची रक्कम अदा करण्यासाठी पंचनाम्याची अट वगळण्यात आली आहे. तर सदर सूट इतर प्रकरणी पुर्वादाहरण म्हणून मानण्यात येणार नाही असंही सरकारने स्पष्ट केलंय.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीकपीक विमामहाराष्ट्र