पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान योजना) या केंद्र शासनाच्या योजनेतून ९८ टक्के शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यात आले आहे.यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३ लाख ३२ हजार ३४ शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मान निधीचा १५ वा हप्ता जमा केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी मंगळवारी दिली. ई-केवायसी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा झाली आहे.
कोणत्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र?
कन्नड ४० हजार ३१२, सिल्लोड ५० हजार ६२७, सोयगाव १५ हजार ६५१, छत्रपती संभाजीनगर ३१ हजार ४९१, गंगापूर ४२ हजार ५१६, खुलताबाद १५ हजार ४८, पैठण ४२ हजार ७५४, फुलंब्री ३० हजार २२५, वैजापूर ५७ हजार ६७१ आणि शहरी भागातील २ हजार २८५ शेतकऱ्यांचे ई-केवायसी मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत केले आहे. जिल्ह्यातील ४ लाख १ हजार ६६१ शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधीसाठी अर्ज दाखल केले होते. जिल्हा प्रशासनाने जवळपास ८२ टक्के शेतकऱ्यांची म्हणजे ३ लाख ९ हजार २०० ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. ३ लाख ३२ हजार ३४ शेतकऱ्यांच्या खात्यात निधीचा १५ वा हप्ता जमा केला आहे.
पीएम किसान सन्मान निधी
- पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना 1 डिसेंबर 2018पासून देशात लागू करण्यात आली.
- या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते.
- या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 4 महिन्यांच्या अंतरानं दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
- तुमच्या खात्यात PM-Kisanचा हप्ता जमा झाला की नाही, हे एकतर तुम्हाला मोबाईलवर मेसेजद्वारे कळवले जाते किंवा वेबसाईटवरही तुम्ही ते चेक करू शकता.
या योजनेअंतर्गत नाव नोंदवायचे असेल तर काय कराल?
- या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रे गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकतो.
यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स लागते.
- CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो. मात्र इथे नोंदणी करायची असल्यास त्यासाठी ठरावीक शुल्क आकारले जाते.
- शेतकरी स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करू शकतात.