अनिल महाजन
विविध कार्यक्रमात फुलांचा वापर वाढला आहे. त्यामुळे फुलांची मागणी वाढली असून फूलशेती फायद्याची ठरत आहे. बाजारातही फुलांना मोठी मागणी असल्याने जरबेरा, शेवंती, झेंडूची शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. धारुर येथील प्रियंका गणेश सावंत फूलशेतीतून कमी खर्चात जास्त नफा मिळवत आहेत. त्यांना नुकताच राज्य शासनाचा राजमाता जिजाऊ कृषिभूषण पुरस्कार मिळाला आहे.
मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम तापमान फूलशेतीसाठी पोषक असते. अनेक शेतकरी भाजीपाला शेतीबरोबर फुलांची शेतीदेखील करीत आहेत. बाजारात फुलांना चांगली मागणी मिळत असल्याने आता फूलशेतीही इतर पारंपरिक शेतीपेक्षा नफ्याची ठरत आहे. लग्न समारंभात फुलांचा वापर होत असल्याने फुलांची मागणी वाढली आहे. बाजारात फुलांना १५० ते १८० रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव मिळत आहे.
फूलविक्रेते व्यापारी शेतीच्या बांधावरच फुलांची खरेदी करीत असल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांना थोड्या कमी भावात फुलांची विक्री करावी लागली तरीही फूलशेती आर्थिक सुबत्ता मिळवून देणारी ठरत आहे. तालुका कृषी अधिकारी जनार्धन भगत, मंडळ कृषी अधिकारी चेतन कांबळे, कृषी सहायक श्रीनिवास अंडील, राजेंद्र राऊत येथील शेतकऱ्यांना फुलांची शेती करण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत.
भाजीपाला पिकाला लागवड, खते हा खर्च जास्त असतो. तसा फूलशेतीला नाही. उत्पन्न खर्च कमी आणि बऱ्यापैकी नफा फूलशेतीत असल्याने दहा- बारा वर्षापासून फुलाची शेती करीत आहे. विशेषकरून उन्हाळ्यात शेवंतीच्या फुलांची मागणी वाढते. त्यामुळे या कालावधीत फुलांची शेती फायद्याची ठरते. अनेक वर्षांपासून मी फुलांची शेती करीत आहे. - गणेश सावंत, शेतकरी
शेतकऱ्याऱ्यांनी झेंडू, शेवंती या फूलशेतीबरोबर गुलाब, मोगरा, जरबेरा या फुलांची शेती करावी. चांगल्या दर्जाची फुले असल्यास फुलांना चांगला भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी फूलशेतीकडे वळण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी फूल व इतर नगदी पिकांच्या लागवडीकडे चळावे. - जनार्दन भगत, तालुका कृषी अधिकारी
हेही वाचा - काय ते गार्डन, काय तो मंडप; शेतकरी जावई असलेल्या लेकीच्या लग्नाला शेतात हिरवळ