Join us

घराघरांतील आधुनिक झाडूंच्या वापराने केरसुणीच झाली साफ; कारागिरांवर उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 10:09 AM

विविध प्रकारचे झाडू विक्रीसाठी आल्याने पारंपरिक केरसुणी (झाडू) ला आता कुणी विचारत नाही

दिवाळीत लक्ष्मीपूजनाला केरसुणीची पूजा करण्याची प्रथा आहे. ग्रामीण भागात आजही काही ठिकाणी ही प्रथा पाळली जाते. श्रीमंतांच्या महालापासून तर झोपडीतील गरिबांपर्यंत सर्वच घरांत लक्ष्मीपूजनासाठी केरसुणी आवर्जून खरेदी केली जायची.

यामुळे केरसुणीची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात व्हायची. मात्र, सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बाजारात आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेले विविध प्रकारचे झाडू विक्रीसाठी आल्याने पारंपरिक केरसुणी (झाडू) ला आता कुणी विचारत नाही. त्यामुळे या केरसुणी तयार करणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

नांदेड शहरातील देगलूर नाका रोडवरील प्रीतिनगर, शांतीनगर भागात आजही ५० ते ६० कुटुंब पारंपरिक पद्धतीने केरसुणी (झाडू) तयार करण्याचे काम करतात. पिढ्यान् पिढ्या कित्येकांचा हाच व्यवसाय असल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहदेखील याच व्यवसायावर अवलंबून आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात सिंधीच्या पानांपासून बनवलेल्या केरसुणीला मागणी होती. दिवाळी, लक्ष्मीपूजन, लग्न समारंभ आदींसाठी केरसुणीची खरेदी करण्याची परंपरा होती.

मात्र, आता या पारंपरिक व्यवसायावर अवकळा येऊ लागली. सध्या आधुनिक प्रकारच्या विविध झाडूंनी आपली छाप ग्राहकांवर टाकली आहे. शिवाय बाजारपेठही काबीज केली आहे. यामुळे पूर्वी घरोघरी दिसणाऱ्या केरसुणीचे महत्त्व कमी होऊ लागले.

त्यासोबत सिंधीच्या झाडांची संख्या कमी होत असल्याने हा व्यवसाय करणारे आता बोटावर मोजण्याइतके राहिले आहेत. यामुळे हा व्यवसाय अखेरच्या घटका मोजत वेळ आली आहे. आहे. तर कारागिरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. indian cultural household broom

झाडूंचे अनेक पर्याय उपलब्ध

यापूर्वी ग्रामीण भागातील कारागीर मोठ्या प्रमाणात झाडू, केरसुणी तयार करायचे. तसेच त्याची गावोगावी फिरून विक्री करत होते. पूर्वी मातीचे घर असल्यामुळे घर झाडूने फरफर झाडले जायचे; पण आता सगळीकडे सिमेंटची घरे झाली.

त्यामुळे पूर्वीच्या झाडूने ते सिमेंटचं घर नीट झाडता येत नसल्यामुळे आणि बाजारात विविध प्रकारचे झाडू उपलब्ध असल्याने जुन्या झाडूकडे बहुतांश गृहिणींनी पाठ फिरवल्याचं दिसून येते. त्यामुळे झाडू व्यवसायावर अवकाळा आली आहे.

कष्टाचा मोबदला मिळत नाही

आमचं संपूर्ण कुटुंब हाच व्यवसाय करतं. २० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंतचे झाडू, केरसुणी उपलब्ध आहेत. कमी दर असतानाही ग्राहक वस्तूचा भाव करतात. आमच्या या धंद्यात कष्टाचा योग्य मोबदला मिळत नाही. झाडू तयार करताना संपूर्ण हातांची साल सोलली जाते; पण पोटापाण्यासाठी करावं लागतं. - भगवान बोकेफोड, कारागीर.

शासनाने मदत करावी

लहानपणापासून केरसुणी तयार करण्याचे काम करत आहे. पिढ्यान् पिढ्या हा व्यवसाय करत आलोय. केरसुणीला लक्ष्मी मानले जाते आणि ते बनविण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. मात्र, सध्या हाताने तयार केलेल्या केरसुणीला पाहिजे तशी मागणी राहिली नाही. शासनाने कारागिरांना आर्थिक मदत करावी. - सरूबाई भिसे, कारागीन.

झाडूसाठी कमाई कमी, खर्चच अधिक

• सिंधीच्या पानोव्यापासून झाडू बनवले जातात; पण झाडू बनवण्यासाठी जी सिधीची झाडं लागतात, ती खूप कमी झाली आहेत. त्या तुलनेत झाडू बनविण्यासाठी खर्च अधिक वाढला आहे.

• झाडं कमी झाल्यानं पानोळ्या मिळणं कठीण झालं आहे. मध्य प्रदेशातून या सिंधीच्या पानोळ्या मागवल्या जात आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च अधिक वाढल्याने कमाई कमी आणि खर्च अधिक झाला आहे.

हेही वाचा - Success Story दोन एकर केशर आंबा बागेतून उच्चशिक्षित तरुणाला ८ लाखांचे उत्पन्न

टॅग्स :ग्रामीण विकाससांस्कृतिकशेतीशेती क्षेत्रनांदेडनांदेड