रशिद शेख
औंध : खरीप व रब्बी हंगामाच्या सुगीत गहू, ज्वारी व इतर धान्य शेतातून मळणी करून घरी आणल्यानंतर तेथून महिलांच्या कष्टाचा प्रवास सुरू होतो. यामध्ये प्रामुख्याने धान्य वाळविणे, त्यातील मातीचे खडे, कुड्या, बोंडे वेचणे यामध्ये संपूर्ण उन्हाळा हीच कामे महिलांच्या डोक्यावर बसत असतात.
यंदा मात्र धान्य स्वच्छ करणाऱ्या यंत्राने महिलांना दिलासा दिल्याने त्या यंत्राला मागणी होत आहे. पारंपरिक शेती व्यवसायात दिवसेंदिवस सुधारणा होत असून, आता आधुनिक यांत्रिकीकरणाकडे शेती व्यवसायाची वाटचाल सुरू आहे.
मजुरांच्या तुटवड्यामुळे शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला आहे. त्यामुळे यंत्रपद्धतीकडे शेतकरी वर्ग वळला आहे. शेतकरी वर्ग शेतातील सुगी संपवून अन्नधान्य जेव्हा घरी घेऊन येतो, त्यावेळी आहे तसेच तो घरी खायला ठेवत नाही, अथवा बाजारातही विकत नाही.
धान्य घरी आणले म्हणले की वाळवणे, पाखडणे, कचरा, घाण, खडे बाजूला करणे ही कामे महिला वर्गांना आजही दिली जातात; परंतु यंदाच्या सुगीला गावोगावी ट्रॅक्टरला जोडून मशीन फिरत असून मागणी वाढली आहे.
धान्य स्वच्छ करण्याच्या कामाला महिलांना प्रचंड शारीरिक कष्ट व वेळ द्यावा लागत होता. या यंत्रामुळे वेळ आणि महिलांचे कष्ट दोन्हीची बचत होत असल्याने महिलांना यंदाच्या सुगीला थोडाफार आराम मिळाल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
हे यंत्र दिवसाला अंदाजे ५ हजार किलो म्हणजे ५० क्विंटल धान्य स्वच्छ करून देत आहे, त्यामुळे गावोगावी ग्रुप करून जो तो आपले धान्य स्वच्छ करून घेत आहे. एका क्विंटलला सर्वसाधारण १२५ रुपये खर्च येत असला तरी वेळ आणि श्रम वाचत असल्यामुळे महिला वर्गातून या यंत्राला पसंती मिळत आहे.