Join us

शेतात काम नक्की करा कष्टाचे; मात्र आरोग्य देखील अबाधित राखा शेतकरी दादांनो आपआपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 23:26 IST

Farmer Health : शेतीतील काम हे शारीरिक दृष्ट्या खूपच कष्टसाध्य असते. परंतु, शेतात काम करत असताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे.

शेतीतील काम हे शारीरिक दृष्ट्या खूपच कष्टसाध्य आहे. परंतु हे शेती काम करत असताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे.

विशेषतः कान, नाक आणि घसा हे तीन अवयव अत्यंत नाजूक असून ते सहजच विविध प्रकारच्या धूळ, मातीचे कण, आणि पर्यावरणातील हानिकारक घटकांमुळे त्रासदायक होऊ शकतात. त्यामुळेच या अवयवांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.

शेतात काम करत असताना आपण सतत धूळ, मातीचे कण, आणि इतर सूक्ष्म कणांशी उदा. शेतातील काडी/कचरा इत्यादी संपर्कात येतो. हे कण आपल्या नाकपुड्या, कान, आणि घशात जाऊन ॲलर्जी, संसर्ग, आणि श्वसनाशी संबंधित आजार निर्माण करू शकतात. 

संक्रमण आणि कारणीभूत गोष्टी 

धूळ : नाकात धूळ जाऊन जळजळ, ॲलर्जी, आणि श्वसनाच्या त्रासाला कारणीभूत ठरू शकते. तसेच घशात धूळ गेल्यास खोकला, घशातील खवखव, आणि कधी कधी गंभीर संक्रमण होऊ शकते.

मातीचे कण : कानात धूळ गेल्यास कानातील संसर्ग, वेदना, किंवा ऐकण्याची क्षमता कमी होण्याचा धोका असतो.

शेतात काम करत असताना घ्यावयाची काळजी

नाक व तोंडावर मास्क : धूळ आणि परागकणांपासून बचावासाठी नाक व तोंडावर मास्क घालणे अत्यंत गरजेचे आहे.

कानाची योग्य स्वच्छता : कान स्वच्छ ठेवण्यासाठी ओल्या कापडाने बाहेरील भाग हळुवार पुसावा. कधीही कापसाचे बोळे कानाच्या आत घालू नयेत.

नियमित पाण्याचे सेवन : भरपूर पाणी पिल्याने नाकपुड्या ओलसर राहतात आणि धूळ व जंतू दूर होण्यास मदत होते.

आरोग्यदायी आहार : आरोग्यदायी आहार घेतल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

स्वच्छतेची सवय : शेतात काम केल्यानंतर हात, चेहरा, आणि कपडे स्वच्छ धुणे आवश्यक आहे.

शेतातील कठोर श्रमांबरोबरच आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण, निरोगी शरीराशिवाय आपले कामही अर्धवट राहते. कान, नाक, आणि घशाची योग्य काळजी घेतल्यास आपण केवळ आजारांपासून वाचू शकतोच, पण आपल्या शेतातील कामही अधिक प्रभावीपणे पार पाडू शकतो.

हेही वाचा : कामाच्या आवाक्यात उद्भवू शकतो आजार; शेतकरी बांधवांनो हाडांच्या समस्येकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका

टॅग्स :आरोग्यअन्नहेल्थ टिप्सशेती क्षेत्रशेतकरीशेती