Working Women :
शिवाजी कदम
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या महिलांची यादी शासनाकडून मागविण्यात आली आहे. सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी रोजगार हमीवर काम करणाऱ्या महिलांना थेट लाभ देण्याची तयारी सरकारने केली आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' शासनाकडून नुकतीच जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. ३१ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ सरकारकडून देण्यात आलेली आहे. या योजनेला महिलांकडून भरघोस प्रतिसाद देण्यात येत आहे. या योजनेचा थेट लाभ रोजगार हमीवर काम करणाऱ्या महिलांना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
महिलांचा डाटा तयार
* रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या जिल्ह्यातील महिलांचा डेटा रोजगार हमी विभागाकडे तयार आहे.
* जॉब कार्ड योजनेसाठी असणाऱ्या महिलांचे आधार कार्ड नंबर, बँक पासबुकची संपूर्ण माहिती विभागाकडे उपलब्ध आहे. यामुळे योजनेत काम करणाऱ्या कुठल्याही महिलेची वेगळी माहिती पाठविण्याची गरज नाही.
५ लाख लाभार्थ्यांची माहिती सादर
जालना जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या रोजगार हमी योजना कार्यालयाकडून जिल्ह्यातील जॉब कार्डधारक असणाऱ्या ५ लाख ३५ हजार लाभार्थ्यांची माहिती शासनाकडे पाठविण्यात आली आहे. यातील सुमारे ५० टक्के महिला आहेत.
शासनाकडून निर्देश
रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या महिलांची माहिती तत्काळ देण्याचे निर्देश शासनाकडून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. यानुसार जालना जिल्ह्यातील रोजगार हमी योजना विभागाकडून जॉब कार्ड असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची माहिती शासनास सादर करण्यात आली आहे.