Join us

World Agriculture Foram : महाराष्ट्र शेतीत देशाचा कणा बनणार; शाश्वत शेती प्रयत्नांना शेतकऱ्यांच्या यशाची जोड 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:49 AM

जागतिक बांबू दिनाच्या औचित्याने वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचे पुरस्कार वितरण वाचा सविस्तर (World Agriculture Foram)

मुंबई: 

जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राने नेहमीच भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आलेल्या जागतिक कृषी पुरस्कारांबद्दलकौतुकोद्‌गार काढले आहेत. 

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या माध्यमातून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फोरमचा हा दुसराच पुरस्कार आहे. हा पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांना प्रदान करण्यात आला.

जागतिक बांबू दिनाच्या औचित्याने या समारंभाचे आयोजन करण्यात आले. एनसीपीएच्या सभागृहात झालेल्या या समारंभास महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, 'वर्ल्ड एग्रीकल्चर फोरम' चे अध्यक्ष डॉ. रुडी रेलिंगे, फोरमचे आशिया प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. विलियम्स दार, आफ्रिका प्रांताचे उपाध्यक्ष प्रो. लिंदवे सिंबादा, अमेरिका प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. केनिथ क्वीन, फोरमचे भारतातील संचालक तथा इंडियन चेंबर ऑफ फूड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष डॉ एमजे खान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराहे उपस्थित होते. 

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचा जागतिक कृषी पुरस्कार हा महाराष्ट्रातील राबणाऱ्या शेतकऱ्यांना अर्पण करत असल्याचे नमूद करून महाराष्ट्राला शेतीच्या क्षेत्रातही पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ सप्टेंबर रोजी दिली. 

राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले की, राज्यातल्या कृषी विद्यापीठांमध्ये कृषी क्षेत्राशी संबंधीत नवनवीन तंत्रज्ञानाविषयी संशोधन करण्यात येत आहे. या नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणि आर्थिक सुबत्ता निर्माण करत असल्याचा सार्थ अभिमान आहे.

हा पुरस्कार महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रातील यशाचे आणि शाश्वत शेतीतील प्रयोग आणि प्रयत्नांचे जागतिक पटलावर प्रतिबिंबित करणारा आहे. हा पुरस्कार केवळ मुख्यमंत्री शिंदे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या कृषी नवकल्पना आणि पर्यावरणीय शाश्वततेमध्ये केलेल्या जागतिक पातळीवरील योगदानाचे सन्मान आहे. 

महाराष्ट्राने भारताच्या कृषी क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण स्थान राखले आहे. आपले शेतकरी, आपल्या अन्नसुरक्षेत महत्वपूर्ण भूमिका बजावत असून त्यांच्या जिद्दी आणि कष्टांनी देशाचा कणा बनले आहेत. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती