अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : नारळी, पोफळींच्या बागा असे वर्णन केल्या जाणाऱ्या कोकणातील नारळ लागवड क्षेत्र कमी होत चालले आहे. गेल्या वर्षभरात नारळ लागवड क्षेत्रात न झालेली वाढ चिंतेची बाब आहे.
भौगोलिक परिस्थिती, अपुरी सिंचन सुविधा, अपुरे मनुष्यबळ आणि विपणन सुविधेचा अभाव यामुळे नारळ लागवडीचे क्षेत्र कमी राहिले आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी सहकार तत्वावर काम करण्याची गरज आहे.
किनारपट्टीच्या भागात विशेषतः केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांत नारळाचे पीक घेतले जाते. महाराष्ट्रात नारळ लागवडीचे एकूण क्षेत्र ४३,१६० हेक्टर इतके आहे. त्यातून २२.३६ लाख इतके उत्पादन मिळते.
महाराष्ट्रात सर्वांत जास्त उत्पादन सिंधुदुर्ग जिल्ह्यात १,४५७ लाख इतके घेतले जाते. तर रत्नागिरी जिल्ह्यात ४०६ लाख असे एकूण १८ कोटी ६३ लाख इतके उत्पादन घेतले जाते. मात्र, गेल्या वर्षभरात कोकणात नारळ लागवडीच्या क्षेत्रात अत्यल्प वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादनाचे प्रमाण कमीच आहे.
कोकण किनारपट्टीवर नारळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ शकते. मात्र, पर्यटनाच्या मुद्यामुळे किनारपट्टीवर लागवड केली जात नाही. नारळ लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी सहकार तत्त्वावर पाठबळ मिळणे गरजेचे आहे.
नारळ पिकाशी निगडित प्रक्रिया उद्योग उभे राहिल्यास नारळ लागवडीचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल. तसेच झाल्यास नारळ उत्पादन वर्षभर उत्पन्न मिळू शकते. अन्य पिकांप्रमाणे नारळाची वाहतूक करणे महाग असल्याने त्याची निर्यात करणेही कठीण जाते. त्यामुळे नारळ उत्पादनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
नारळ उत्पादनातून उद्यमशीलतेला मोठा वाव आहे. पारंपरिक नारळ बागेमध्ये उत्पादन वाढीसाठी नारळ आधारित एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. नारळ उत्पादन आणि उद्योग यामध्ये अधिकाधिक मूल्यवर्धन, भागधारी निर्मिती आणि त्या माध्यमातून परिभ्रमणीय अर्थव्यवस्था निर्माण करणे हा नारळ दिनाचा उद्देश आहे. - डॉ. किरण मालशे, कृषिविद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये, रत्नागिरी