Join us

जागतिक शाकाहारी दिन २०२३: जगभरात वाढतेय शाकाहाराची लोकप्रियता

By मुक्ता सरदेशमुख | Published: October 01, 2023 5:58 PM

युरोप आणि अमेरिकेसारख्या जगभरातील अनेक विकसित अर्थव्यवस्थांमध्ये शाकाहार वाढतोय..

मांसाहार करणाऱ्याला शाकाहारी चिडवण्यापासून चिकन की पनीर असे विनोद आपल्या आजूबाजूला अनेकदा होताना दिसतात. पण यावरून आपण आपल्या अन्नसाखळीविषयी किती सजग आहोत हे समजू शकते. दरवर्षी जागतिक शाकाहारी दिवस १ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. शरीराच्या पोषणासाठी आवश्यक ऊर्जेपासून आरोग्य, पर्यावरण अशा अनेक विभागांमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या शाकाहाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 

जागतिक शाकाहारी दिनाची स्थापना 1977 मध्ये नॉर्थ अमेरिकन व्हेजिटेरियन सोसायटीद्वारे करण्यात आली होती. 1978 मध्ये आंतरराष्ट्रीय शाकाहारी संघाने त्याला मान्यता दिली आणि त्यानंतर एक ऑक्टोबर हा दिवस शाकाहाराविषयी लोकांना जागरुक करण्यासाठी साजरा केला जातो.

अलीकडच्या काळात जगभरात वाढत जाणारी शाकाहाराविषयीची लोकप्रियता मोठी आहे. युरोप आणि अमेरिकेसारख्या जगभरातील अनेक विकसित अर्थव्यवस्थांमध्ये शाकाहार हळूहळू वाढत आहे. परंतु भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये जिथे मुळातच शाकाहार मोठा आहे तिथे ही लोकप्रियता काहीशी कमी होताना दिसते असे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेचे निरीक्षण आहे. 

पारंपारिक शाकाहारी आहार घेणाऱ्या लोकांचे प्रमाण 2018- 19 मध्ये एक तृतीयांश असल्याचे सांगितले जात होते परंतु 2021-22 मध्ये हे प्रमाण सुमारे एक चतुर्थांश इतके कमी झाल्याचे स्टेटस ग्लोबल कंज्यूमर सर्वेक्षणानुसार निदर्शनास आले. वेगवेगळ्या भाज्यांमधून, फळांमधून, दुग्धजन्य पदार्थांमधून मिळणाऱ्या  पोषक तत्त्वांनी तसेच वेगवेगळ्या वनस्पती आधारित आहाराचे आरोग्यदायी परिणाम किती मोठे आहेत याची जाणीव होणे यात ही लोकप्रियता दडलेली दिसते . 

खरेतर वेगवेगळ्या भौगोलिक रचनांमुळे त्या भागातली अन्नसाखळी विकसित झाली. त्या भागातील तापमानाचा तिथल्या आहारावर मोठा परिणाम झाला. मग थंड हवामान असलेल्या जागी शरीराला लागणारी उष्णता किंवा ऊर्जा ही मांसाहाराने पूर्ण होऊ लागली आणि उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये शाकाहार रुजला गेला. हळूहळू ही अन्नसाखळी त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग बनली. 

अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांनी दिलेल्या अहवालातून शाकाहाराचे अनेक फायदे दिसून आले आहेत. अनेक दशकांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की भूमध्य सागरीय आहार हा जगातील सर्वात आरोग्यदायी आहारंपैकी एक आहे. म्हणजे प्रामुख्याने फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, शेंगा, ऑलिव्ह ऑइल, वनस्पती आधारित पदार्थ असणाऱ्या प्रदेशातील आहार.

शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांची दैनिक मात्राही शाकाहारातून पूर्ण होते. अनेक आहार अभ्यासकांनीही असे नोंदवले आहे की जे लोक वनस्पती आधारित आहार खातात त्यांच्यामध्ये लठ्ठपणा, हृदयविकार, कर्करोग आणि मधुमेहाचा धोका हा सर्वात कमी असतो. जगभरातील १.७ अब्जाहून अधिक प्राणी पशुधन उत्पादनात वापरले जातात आणि पशुखाद्य उत्पादन पृथ्वीच्या एकूण शेती योग्य जमिनीपैकी एक तृतीयांश क्षेत्रावर होते असे निष्कर्ष लाईफ स्टॉप इन चेंजिंग लँडस्केप या अहवालात आला होता. 

जगभरातील सर्व हरितगृह वायू उत्सर्जनासाठी 18% पशु कृषी उद्योग ज्यामध्ये खाद्य उत्पादन आणि वाहतूक समाविष्ट आहे.  (ग्रीनहाऊस गॅस एमिशन) जगभरातील पशुंच्या कार्बन फुटप्रिंटवर म्हणजेच प्राण्यांच्या घटणाऱ्या संख्येवर याचा परिणाम होऊ शकतो. 

     
टॅग्स :भाज्याशेतकरीसांस्कृतिकशेती क्षेत्र