नाशिक : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे विचार समजून घेतांना आजच्या काळात आपल्या आवतीभवती काय सुधारणा करायला वाव आहे, एवढे जरी आपण केले, तरी त्यांचे काम आपण पुढे नेऊ शकतो, असे प्रतिपादन नाशिक मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले. तर प्रा. वृषाली रणधीर यांनी एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या कार्याचा इतिहासच उपस्थितांसमोर सादर केला. आपल्या उत्कृष्ट अशा अभिनय आणि प्रभावी शैलीने त्यांनी उपस्थितांची भरभरून दाद मिळविली.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्यासावित्रीबाई फुले अध्यासनामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे हे होते, तसेच प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. वृषाली रणधीर, याबरोबरच मंचावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा. अनिल कलकर्णी, कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख, सावित्रीबाई फुले अध्यासनाच्या प्रमुख डॉ. चेतना कामळस्कर हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासनाच्या प्रमुख डॉ. चेतना कामळस्कर यांनी केले.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील श्रीमती माया खोडवे यांनी निरक्षर असताना देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डिजीटल पत्रकारिताद्वारे आपल्या जगण्यातील विविध प्रश्नांना, समस्यांना स्वत:च वाचा फोडली आहे. ‘आपण आपले जगणे माडंले पाहिजे आणि त्यासाठी शिकले पाहिजे’ ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची शिकवण त्यांनी आपल्या जीवनात आचरणात आणली. कचरा वेचक महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी सुरू केलेल्या चळवळीने काळाच्या ओघात एक एक पाऊल पुढे टाकत समाज समुहातील समस्या सोडविण्यासाठी त्या अहोरात्र कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन श्रीमती माया खोडवे यांच्या कार्याचा गौरव म्हणून कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे व प्रा. वृषाली रणधीर यांच्या हस्ते मानपत्र, स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
एकपात्री प्रयोगही सादर
सदर कार्यक्रमात प्रा. वृषाली रणधीर यांनी एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या कार्याचा इतिहासच उपस्थितांसमोर सादर केला. आपल्या उत्कृष्ट अशा अभिनय आणि प्रभावी शैलीने त्यांनी उपस्थितांची भरभरून दाद मिळविली. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, या कार्यक्रमास तुम्ही दोघी सावित्रीच्या लेकी मान्यवर पाहूण्या म्हणून उपस्थित राहिल्यामुळे ह्या कार्यक्रमाने मोठी उंची गाठली आहे. याप्रसंगी त्यांनी सावित्रीबाई आणि ज्योतीराव फुले यांचे विविध प्रसंग उपस्थितांसमोर मांडले. याप्रसंगी विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा. अनिल कुलकर्णी, कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमात विद्यापीठात बागकाम करणारी महिला कर्मचारी उषा वनसे यांनी स्वयंस्फूर्तीने उपस्थित महिलांसाठी दोन कविता सादर केल्या.