वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सततचा पाऊस, ढगाळ वातावरणामुळे रस शोषण करणाऱ्या किडींचे प्रमाण वाढले असून, पांढऱ्या माशीमुळे सोयाबीन पिकावर 'पिवळा मोझॅक', तसेच मायक्रोफोमिना फेजिओलिना या बुरशीची वाढ होऊन चारकोल रॉट या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. यावर नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
सद्यः स्थितीत सोयाबीनचे पीक शेंगा, फुलांवर असून, या पिकावर सततचा पाऊस, ढगाळ वातावरणामुळे विविध किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. सततच्या पावसामुळे या पिकावर 'पिवळा मोझॅक', तसेच मायक्रोफोमिना फेजिओलिना या बुरशीची वाढ होऊन चारकोल रॉट या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे.
यामुळे पीक करपून मोठ्या प्रमाणात उत्पादन घटण्याची भीती आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी या रोगाचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विभागाने उपाययोजना सुचविल्या आहेत. याचा शेतकऱ्यांनी अवलंब करून पिकाचे रक्षण करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम आरीफ शहा यांनी केले आहे
चारकोल रॉटच्या प्रतिबंधासाठी हे करा
कार्बनडायझिम १ ग्रॅम, १ लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची रोगग्रस्त भागात अळवणी केल्यास रोगाचा प्रसार थांबता येईल, तसेच कीटकनाशकासोबत कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा प्रोपॅक्लोनॅझोल या बुरशीनाशकाची फवारणी केल्यास रोगाचा प्रसार होणार नाही. वरीलप्रमाणे शेतकरी बांधवांनी शिफारशीनुसार लेबल क्लेम औषधीचा वापर करावा
असा करा पिवळा मोझॅकचा बंदोबस्त
पिवळा मोझॅकग्रस्त झाडे तत्काळ उपटून नष्ट करावी. एकरी १५ ते २० पिवळे चिकट सापळे लावावे, पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झाम १२.६० टक्के अधिक लँबडा सायहॅलोथ्रीन ९.५० टक्के झेड सी. २.५ मिली, १० लिटर पाणी किंवा बिटासायफ्लुथ्रीन ८.४९ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के ७ मिली, १० लीटर पाणी या कीटकनाशकाची तत्काळ फवारणी करावी.
२.९९ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात सोयाबीन पेरणी
जिल्ह्यात २ लाख ९७ हजार ८६० हेक्टरपेक्षा थोड्या अधिक क्षेत्रात सोयाबीनची पेरणी अपेक्षीत असताना यंदाच्या खरीप हंगामात प्रत्यक्ष २ लाख ९९ हजार २२१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. जुलैपासून वारंवार होत असलेल्या पावसामुळे या पिकावर मोठा परिणाम झाला. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने या पिकाचे मोठे नुकसानही झाले आहे.
कोणत्या तालुक्यात किती हेक्टरवर सोयाबीन
तालुका | क्षेत्र (हेक्टर) |
कारंजा | ५१,६७८,०० |
मंगरुळपीर | ४६,६२८,०० |
मालेगाव | ५६,२२०,०० |
रिसोड | ५६,९६६,०० |
वाशिम | ५८,२१३.९७ |
मानोरा | २९,५१५,०० |