मंगळवेढा : खरीप हंगामासाठी एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली. एक रुपया भरून बँक, विमा कंपनी प्रतिनिधी, सेतू केंद्र यांच्यामार्फत योजनेतील सहभागाची शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात येत आहे.
परंतु, मंगळवेढा तालुक्यातील काही सीएससी, सायबर कॅफे, ऑनलाइन सेंटरकडून फॉर्म भरण्याचा खर्च म्हणून १०० ते १५० रुपये घेतले जात आहेत.
महसूल व कृषी विभागाचा 'एक रुपयात पीक विमा' योजनेचा गाव पातळीवर जोरदार प्रचार सुरू आहे. यासाठी सीएससीला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम ४० रुपये मिळत असल्याने पीकविमा भरण्यासाठी काही सीएससी केंद्रचालक १०० ते १५० रुपये घेत असून, शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा प्रकार सुरू आहे.
सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा म्हणून एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सीएससी केंद्रांतून शेतकऱ्यांना पीकविमा अर्ज करायला सांगितले आहे. परंतु, काही केंद्रचालकच शेतकऱ्यांकडून पीकविम्याच्या नावाखाली अर्ज भरण्यासाठी जादा रुपये आकारून आर्थिक लूट करत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
'शुल्क'चे फलक दर्शनी भागात नाहीत
महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार आणि सेतू केंद्राच्या दर्शनी भागात सेवा शुल्काचे दरफलक लावण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले होते. मात्र, बऱ्याचशा केंद्रांवर दरपत्रक लावलेले नाही. शासनाच्या विविध योजना तसेच शाळा, महाविद्यालयात प्रवेशासाठी महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार आणि सेतू केंद्रातून रहिवासी, उत्पन्न, डोमिसाइल, नॉन क्रिमिलेअर, जात प्रमाणपत्र अशी १६ प्रकारची प्रमाणपत्रे दिली जातात. अवघ्या ३५ रुपयांच्या प्रमाणपत्रासाठी ७०० ते दोन हजार रुपये आकारले जाताहेत.
शेतकऱ्यांचे पीक विमा फॉर्म महा ई-सेवा केंद्र चालक यांनी मोफत भरून द्यायचे आहेत. एक फॉर्म भरल्यानंतर केंद्र चालकास ४० रुपये मिळणार आहेत. अतिरिक्त शुल्क वसूल करत असणाऱ्या केंद्र चालकांची तहसील प्रशासनाकडे तक्रार करावी. - गणेश श्रीखंडे, तालुका कृषी अधिकारी, मंगळवेढा
काही केंद्र चालकांकडून मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केले जात असल्याचे चित्र मंगळवेढा तालुक्यात दिसून येत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून अधिकचे पैसे घेणाऱ्या सीएससी केंद्राची तत्काळ चौकशी करून केंद्राचे परवाने रद्द करावेत. - रोहिदास कांबळे, तालुका उपाध्यक्ष प्रहार