आटपाडी : तालुक्यातील हिवतड, गोमेवाडी परिसरात प्रतिवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात झेंडूची मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे. हिवतड येथील प्रगतिशील युवा शेतकरी महेश दगडू डिगोळे यांनी मागील तीन वर्षांपासून कष्टातून झेंडूची लागण करुन लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.
पिवळ्या झेंडूला मुंबईसह देशातील विविध बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने 'यलो स्टार झेंडू' हा वाण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. महेश डिगोळे यांनी दोन एकर क्षेत्रात दहा बाय पाच फुटावर पेरूची लागवड केली आहे.
या पेरूमध्येच त्यांनी १० मे रोजी सव्वा फुटावर झिग झॅग पद्धतीने झेंडूच्या आठ हजार रोपांची लागवड केली आहे. शेतात कूपनलिका असून, सोलर सिस्टिमच्या मदतीने या रोपांना ठिबकने वेळोवेळी पाणी देण्यात येते.
सेंद्रिय व रासायनिक बुरशीनाशकांची फवारणी करण्यात येते. आजअखेर चार तोडे झाले असून, सुमारे १४२ पेटी झेंडू मुंबई बाजारपेठेत पाठवला आहे. किलोला ६० रुपयांपासून १२० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.
पाचव्या तोड्याला ७० पेटी झेंडू निघण्याची अपेक्षा असून, १० ते १२ टन एकूण उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. यातून एकरी पाच ते सहा लाखांचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यांना कंपनीचे अधिकारी सुहास पाटील व कचरे रोपवाटिकेचे संचालक अभिजित कचरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
यंदा झेंडू फुलाला बाजारभाव चांगला असून, झेंडू लावणाऱ्यांची संख्या कमी आहे. यार्षी एकरी १२ टनापर्यंत उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. दरवर्षी श्रावण, गणपती, दसरा, दीपावली व मार्गशीर्ष या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात झेंडूला मागणी भविष्यातही असणार आहे. - महेश डिगोळे, प्रगतिशील शेतकरी, हिवतड
अधिक वाचा: Farmer Success Story: जगन्नाथरावांनी झुकिनी पिकात केली कमाल दीड एकरात दहा टनाचे विक्रमी उत्पादन