(Zendu Lagvad)
गजानन वाघ / लिहाखेडी :
सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी परिसरातील शेतकऱ्यांनी २० हेक्टर क्षेत्रात लागवड केलेली झेंडूची शेती सध्या चांगलीच बहरल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या परिसरात ये- जा करणाऱ्या प्रत्येकाचे पिवळीधमक शेती लक्ष वेधून घेत आहे.
दसरा व दिवाळीसाठी झेंडूची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यामुळे झेंडूची लागवड शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी दरवर्षी पारंपरिक पिके घेण्यावर जास्तीचा भर देत होते; परंतु मागील काही वर्षांपासून पारंपरिक पिकातून खर्च अधिक आणि उत्पन्न कमी होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
त्यानंतर शेतकऱ्यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून इतर पिकाकडे पाहण्यास सुरुवात केली. त्यानुसार परिसरातील शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादन देखील घेण्यास सुरुवात केली आहे.
पारंपरिक पिकामागे लागून आपला वेळ व पैसा वाया न घालता नवनवीन प्रयोग अंमलात आणण्याचे काम शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. दसरा व दिवाळीसाठी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री होते.
यामुळे लिहाखेडी, पालोद, सारोळा, मांडणा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी २० हेक्टर क्षेत्रात झेंडूच्या फुलाची शेती फुलविली आहे. झेंडूची शेती सध्या चांगलीच बहरल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या परिसरातून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाचे ही शेती लक्ष वेधून घेत आहे.
अडीच एकर क्षेत्रात मी झेंडूची लागवड केली आहे. कमी खर्चात, कमी पाण्यात, कमी वेळात अधिक उत्पन्न मिळवून देणारे हे पीक असून, सध्या संपूर्ण शेत पिवळे धमक दिसू लागले आहे. त्यामुळे झेंडूतून चांगले उत्पन्न होईल, अशी अपेक्षा आहे. इतर पिकांच्या तुलनेत झेंडूला कमी खर्च व भाव देखील अधिक मिळतो. दसरा व दिवाळीला झेंडूच्या फुलांची मोठी विक्री होते. - अंकुश कळात्रे, शेतकरी, लिहाखेडी
जोरदार पावसामुळे सूर्यफुलाची केली पेरणी
मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने कुठल्याही पिकांतून शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पन्न होऊ शकले नाही. यंदा मात्र ऑगस्ट अखेर व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी नवरात्र, दसरा व दिवाळी सणाचे औचित्य साधून सूर्यफुल पिकाची देखील पेरणी केली आहे.