Zendu Rates : सध्या बाजारामध्ये विविध फुलांची आवक वाढलेली दिसत आहे. तर बाजारही तेजीत असल्यामुळे फुले उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सव आणि जेष्ठ गौरी उत्सवामुळे फुलांना चांगली मागणी असून झेंडू, शेवंती, गुलाब या फुलांचे दरही चांगलेच वाढलेले दिसत आहे.
दरम्यान, सध्या झेंडूच्या फुलाचा विचार केला तर पिवळा आणि भगव्या रंगाच्या झेंडूच्या फुलांना १०० ते १२० रूपये किलोंच्या दरम्यान दर मिळत आहे. तर अमेरिकन काफरी या वाणाच्या झेंडूच्या लाल-पिवळ्या फुलाला तब्बल २०० रूपये किलोंचा दर मिळताना दिसत आहे. गणेशोत्सवामुळे दर वाढल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
का मिळतो या फुलाला जास्त दर?
अमेरिकन काफरी हा झेंडूचा वाण सर्वांत महाग असून ४ रूपयांना एक रोप नर्सरीमध्ये विकत मिळते. अमेरिकन वाण असल्यामुळे आणि पुणे जिल्ह्यात एकाच नर्सरीमध्ये या वाणाची रोपे मिळत असल्याने हे रोपे महाग आहेत. उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे खूप कमी शेतकरी या वाणाची लागवड करतात. म्हणून लोकल वाणापेक्षा या वाणाच्या फुलाला दुप्पट दर मिळतो असं जुन्नर तालुक्यातील अमेरिकन काफरी झेंडू उत्पादक शेतकऱ्याने सांगितले.
उत्सवामुळे दर चांगले
सध्या गणेशोत्सव असल्यामुळे झेंडूला चांगला दर मिळताना दिसत आहे. तर गणेशोत्सव संपल्यानंतर हे दर उतरतील अशी शक्यता आहे. गणेशोत्सव सुरू होण्याअगोदर सुद्धा दर उतरलेलेच होते. नवरात्र उत्सवामध्ये दसऱ्याच्या मुहुर्तावर अनेक शेतकऱ्यांचे फुले बाजारात विक्रीसाठी येतात. त्यामुळे त्यावेळीही फुलांचे दर उतरलेलेच असतात असं शेतकरी म्हणतात.