Lokmat Agro >शेतशिवार > Zero Tillage Farming : शेतातील तणाचाही फायदा करून देणारे विना नांगरणी शेती तंत्रज्ञान काय आहे?

Zero Tillage Farming : शेतातील तणाचाही फायदा करून देणारे विना नांगरणी शेती तंत्रज्ञान काय आहे?

Zero Tillage Farming: What is the no-till farming technology that benefits even weeds in the field? | Zero Tillage Farming : शेतातील तणाचाही फायदा करून देणारे विना नांगरणी शेती तंत्रज्ञान काय आहे?

Zero Tillage Farming : शेतातील तणाचाही फायदा करून देणारे विना नांगरणी शेती तंत्रज्ञान काय आहे?

शेणखतापेक्षाही भारी खत हे पिकांच्या मुळाचं आहे हे सांगणाऱ्या विना नांगरणी शेती तंत्रज्ञानाविषयी जाणून घ्या सविस्तर..

शेणखतापेक्षाही भारी खत हे पिकांच्या मुळाचं आहे हे सांगणाऱ्या विना नांगरणी शेती तंत्रज्ञानाविषयी जाणून घ्या सविस्तर..

शेअर :

Join us
Join usNext

नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेती, झिरो बजेट शेती, जैविक शेती, वैदिक शेती या पारंपारिक शेतीच्या विविध पद्धती. पण मागील काही वर्षांमध्ये यामध्ये विना नांगरणी शेती  तंत्रज्ञान म्हणजे झिरो टिलेज फार्मिंगही मोठ्या प्रमाणात पसरू लागली आहे. काय आहे नेमकं हे शेती तंत्रज्ञान? या तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात प्रचार, प्रसार कुणी केला? ही शेती कशी केली जाते? या शेती तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होतो? जाणून घेऊया सविस्तर...!

विना नांगरणी शेती तंत्रज्ञानाचा जगभरातील विविध देशांमध्ये अनेक शेतकरी अवलंब करतात. त्यामध्ये ब्राझील, अर्जेंटिना, उरूग्वे, पेरूग्वे या देशामध्ये एकूण शेतीच्या ८० टक्के शेती ही विना नांगरणी शेती तंत्रज्ञानाच्या आधारे केली जाते. याव्यतिरिक्त जगातील अनेक देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रचार, प्रसार झालेला आहे. या शेती तंत्रज्ञानाचे जुन्या काळातील पुरावे उपलब्ध असल्याची माहिती आहे. 

पण महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये हे शेती तंत्रज्ञान फारसं वापरलं जात नाही. महाराष्ट्राला या शेती तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यामध्ये कोल्हापुरातील प्रतापराव चिपळूणकर, कर्जतजवळील नेरळ येथील चंद्रशेखर भडसावळे, मराठवाड्यातील दीपक जोशी यांचा मोठा हात आहे. पण हे तंत्रज्ञान महाराष्ट्रात कसं पसरलं?

कोल्हापुरातील प्रतापराव चिपळूणकर हे ७०च्या दशकातले पुणे कृषी महाविद्यालयाचे पदवीधर. जमिनीमध्ये सेंद्रीय कर्बाची कमतरता असल्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात घट झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांचा अभ्यास सुरू झाला. मुळातच कृषी पदवीधर असल्यामुळे त्यांचा जमिनीतील सूक्ष्मजीव आणि त्यांच्या जीवनाविषयी चांगलीच माहिती होती. त्यामुळे त्यांनी पीके, शेणखत, सेंद्रीय कर्ब, जिवाणू आणि त्यांची जीवनपद्धती अभ्यासली. यातून त्यांनी जमिनीमध्ये सेंद्रीय कर्ब वाढीसाठी काय काय करता येईल याचा शोध घ्यायचं ठरवलं.

हरितक्रांतीनंतर भारतात यांत्रिकीकरण वाढलं, शेतीमधील जनावरांचा वापर कमी झाला, शेणखताचा वापर कमी झाला आणि यामुळे शेतातील उत्पादन घटलं असं त्यांच्या लक्षात आलं. यामुळे त्यांनी डोळ्याला न दिसणाऱ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला. त्यातून त्यांना असं कळालं की, जमीनीमध्ये कुजलेले खत टाकण्याची जी शिफारस आहे ती चुकीची आहे. कारण केवळ शेणखतच नाहीतर प्रत्येक कुजणारा पदार्थ हा आपल्या मातीला सेंद्रीय कर्ब उपलब्ध करून देतो अस त्यांच्या लक्षात आलं.

विना नांगरणी शेती तंत्राचा महाराष्ट्राती प्रसार
आपण एखाद्या पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर शेतामधून ते पीक मुळासकट उपटून टाकतो आणि जमीन स्वच्छ करतो हे कसं चुकीचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पिकांचे जमिनीखालील अवशेष तसेच ठेवण्याचा विचार केला. खोडापासून  झाडाच्या शेंड्यापर्यंत अन्नद्रव्याची उपलब्धता कमी कमी होत जाते आणि मुळामध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण सर्वांत जास्त असते हे त्यांच्या लक्षात आलं. 

यामुळे पीक काढल्यानंतर पीकाचे वरील अवशेष कापून घ्यायचे आणि जमीनीखालील अवशेष तसेच ठेवण्याचा प्रयोग त्यांनी वेगवेगळ्या पिकांमध्ये केला. ज्यामध्ये ऊस, भात या पिकांचा सामावेश होता. त्यांनी भात आणि उसाचे खोडकी न काढता पुन्हा दुसऱ्या पिकांची लागवड केली. ज्यामध्ये त्यांना उत्पन्नात वाढ झाल्याचं लक्षात आलं.

पीक काढणीनंतर मातीची कोणतीच हालचाल न केल्यामुळे आणि नांगरट किंवा मशागत न केल्यामुळे त्यांचा एकरी खर्चामध्ये मोठी बचत झाली. यासोबतच एका पिकाचे जमीनीखालील अवशेष कुजून त्याचे सेंद्रीय कर्बात रूपांतर झाले. तर या मुळांच्या जाळ्यामुळे पावसाळ्यात जमीनीमध्ये पाणी मुरण्यासही मदत झाली. एकंदरीत काय तर शेणखतापेक्षा जास्त फायदा केवळ पिकांच्या जमिनीखालील अवशेषांमुळे व्हायला लागला. पुढे त्यांनी हा प्रयोग विविध पिकांमध्ये केला आणि यामध्येही त्यांना चांगला रिझल्ट मिळाला. 

पुढे पिकांच्या उत्पादनानंतर पिकांचे मातीखालील अवशेष न काढता आणि जमिनीमध्ये कोणतीही हालचाल न करण्याच्या या तंत्रज्ञानाला विना नांगरणी शेती तंत्रज्ञान किंवा झिरो टिलेज फार्मिंग असं संबोधलं जाऊ लागलं. जगभरात हे तंत्रज्ञान अनेक शेतकरी वापरत असले तरी महाराष्ट्राला या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात प्रतापराव चिपळूणकर आणि चंद्रशेखर भडसावळे यांचा मोठा हात आहे.  

तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडे
शेतीची हालचाल न करण्याच्या या तंत्रज्ञानामध्ये पिकांमध्ये असलेल्या तणाचं काय करायचं? तण व्यवस्थापन कसं करायचं? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला. पिकांमध्ये असलेले तण उपटून फेकून देण्याची पद्धत मोडून काढून तणनाशकाचा वापर करून तण जाळून टाकणे किंवा तण परिपक्व झाल्यानंतर ब्रश कटर मारून तण कापणे आणि तणाचेंही जमीनीखालील अवशेष जमीनीखालीच ठेवणे हा पर्याय या शेतीमध्ये त्यांनी सुचवला. 

कारण जसं पिकांचे जमीनीखालील अवशेष जमिनीला फायद्याचे ठरतात त्याप्रमाणेच तणांचेसुद्धा जमीनीखालील अवशेष जमिनीला फायद्याचे ठरतात. सोबतच तणांचे आणि पिकांचे सहजीवन शेती करताना फायद्याचे असते असं हे तंत्रज्ञान सांगतं. ज्यामध्ये आपल्या पिकांवर ज्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यातील बऱ्याचशा किडी किंवा अळ्या या तणांवर जगतात. 

आपण शेतातील तण निर्मूलन केले तर त्याच किडी किंवा अळ्या आपल्या पिकांना लक्ष्य करतात. त्यामुळे तण असलेल्या शेतामध्ये पिकांचे कमी नुकसान होत असल्याचं या तंत्रज्ञानाच्या वापरातून लक्षात आलं आणि तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडे वाटचाल सुरू झाली. याप्रमाणे आता तण पूर्णपणे शेतातून काढून न टाकता परिपक्व झाल्यानंतर तणांवर तणनाशक मारणे किंवा ब्रश कटरने तण कापणे हा पर्याय शेतकऱ्यांना सुचवला जातो.

अशा पद्धतीने विना नांगरणी शेती तंत्रज्ञान आता महाराष्ट्रातील अनेक शेतकरी अवगत करू लागले आहेत. मराठवाड्यातील पैठण तालुक्यातील दीपक जोशी यांनी आपल्या शेतात मागील काही वर्षांपासून हे तंत्रज्ञान वापरास सुरूवात केली आणि यामुळे त्यांच्या कोरडवाहू जमीनीतून सुद्धा चांगले पीक आले आहे. यासोबतच मातीमध्ये पाण्याचा निचरा चांगला झाला, कमी पाण्यात रब्बी पिकांनी चांगले उत्पन्न दिल्याचे अनुभव जोशी यांना आले आहेत. 

महाराष्ट्रात आता चंद्रशेखर भडसावळे यांच्या माध्यमातून आणि विविध शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या तंत्रज्ञानाचा प्रसार होत आहे. यासोबतच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजे पोकराच्या माध्यमातूनही आता विना नांगरणी शेती तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. 

Web Title: Zero Tillage Farming: What is the no-till farming technology that benefits even weeds in the field?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.