Join us

Zero Tillage Farming : शेतातील तणाचाही फायदा करून देणारे विना नांगरणी शेती तंत्रज्ञान काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 20:08 IST

शेणखतापेक्षाही भारी खत हे पिकांच्या मुळाचं आहे हे सांगणाऱ्या विना नांगरणी शेती तंत्रज्ञानाविषयी जाणून घ्या सविस्तर..

नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेती, झिरो बजेट शेती, जैविक शेती, वैदिक शेती या पारंपारिक शेतीच्या विविध पद्धती. पण मागील काही वर्षांमध्ये यामध्ये विना नांगरणी शेती  तंत्रज्ञान म्हणजे झिरो टिलेज फार्मिंगही मोठ्या प्रमाणात पसरू लागली आहे. काय आहे नेमकं हे शेती तंत्रज्ञान? या तंत्रज्ञानाचा शोध कुणी लावला? ही शेती कशी केली जाते? या शेती तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होतो? जाणून घेऊया सविस्तर...!

कोल्हापुरातील प्रतापराव चिपळूणकर हे ७०च्या दशकातले पुणे कृषी महाविद्यालयाचे पदवीधर. जमिनीमध्ये सेंद्रीय कर्बाची कमतरता असल्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात घट झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांचा अभ्यास सुरू झाला. मुळातच कृषी पदवीधर असल्यामुळे त्यांचा जमिनीतील सूक्ष्मजीव आणि त्यांच्या जीवनाविषयी चांगलीच माहिती होती. त्यामुळे त्यांनी पीके, शेणखत, सेंद्रीय कर्ब, जिवाणू आणि त्यांची जीवनपद्धती अभ्यासली. यातून त्यांनी जमिनीमध्ये सेंद्रीय कर्ब वाढीसाठी काय काय करता येईल याचा शोध घ्यायचं ठरवलं.

हरितक्रांतीनंतर भारतात यांत्रिकीकरण वाढलं, शेतीमधील जनावरांचा वापर कमी झाला, शेणखताचा वापर कमी झाला आणि यामुळे शेतातील उत्पादन घटलं असं त्यांच्या लक्षात आलं. यामुळे त्यांनी डोळ्याला न दिसणाऱ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला. त्यातून त्यांना असं कळालं की, जमीनीमध्ये कुजलेले खत टाकण्याची जी शिफारस आहे ती चुकीची आहे. कारण केवळ शेणखतच नाहीतर प्रत्येक कुजणारा पदार्थ हा आपल्या मातीला सेंद्रीय कर्ब उपलब्ध करून देतो अस त्यांच्या लक्षात आलं.

विना नांगरणी शेती तंत्राचा उदयआपण एखाद्या पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर शेतामधून ते पीक मुळासकट उपटून टाकतो आणि जमीन स्वच्छ करतो हे कसं चुकीचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पिकांचे जमिनीखालील अवशेष तसेच ठेवण्याचा विचार केला. खोडापासून  झाडाच्या शेंड्यापर्यंत अन्नद्रव्याची उपलब्धता कमी कमी होत जाते आणि मुळामध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण सर्वांत जास्त असते हे त्यांच्या लक्षात आलं. 

यामुळे पीक काढल्यानंतर पीकाचे वरील अवशेष कापून घ्यायचे आणि जमीनीखालील अवशेष तसेच ठेवण्याचा प्रयोग त्यांनी वेगवेगळ्या पिकांमध्ये केला. ज्यामध्ये ऊस, भात या पिकांचा सामावेश होता. त्यांनी भात आणि उसाचे खोडकी न काढता पुन्हा दुसऱ्या पिकांची लागवड केली. ज्यामध्ये त्यांना उत्पन्नात वाढ झाल्याचं लक्षात आलं.

पीक काढणीनंतर मातीची कोणतीच हालचाल न केल्यामुळे आणि नांगरट किंवा मशागत न केल्यामुळे त्यांचा एकरी खर्चामध्ये मोठी बचत झाली. यासोबतच एका पिकाचे जमीनीखालील अवशेष कुजून त्याचे सेंद्रीय कर्बात रूपांतर झाले. तर या मुळांच्या जाळ्यामुळे पावसाळ्यात जमीनीमध्ये पाणी मुरण्यासही मदत झाली. एकंदरीत काय तर शेणखतापेक्षा जास्त फायदा केवळ पिकांच्या जमिनीखालील अवशेषांमुळे व्हायला लागला. पुढे त्यांनी हा प्रयोग विविध पिकांमध्ये केला आणि यामध्येही त्यांना चांगला रिझल्ट मिळाला. 

पुढे पिकांच्या उत्पादनानंतर पिकांचे मातीखालील अवशेष न काढता आणि जमिनीमध्ये कोणतीही हालचाल न करण्याच्या या तंत्रज्ञानाला विना नांगरणी शेती तंत्रज्ञान किंवा झिरो टिलेज फार्मिंग असं संबोधलं जाऊ लागलं आणि या तंत्रज्ञानाचे जनक म्हणून कोल्हापुरातील चिपळूणकर यांना ओळखलं जाऊ लागलं. 

तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेशेतीची हालचाल न करण्याच्या या तंत्रज्ञानामध्ये पिकांमध्ये असलेल्या तणाचं काय करायचं? तण व्यवस्थापन कसं करायचं? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला. पिकांमध्ये असलेले तण उपटून फेकून देण्याची पद्धत मोडून काढून तणनाशकाचा वापर करून तण जाळून टाकणे किंवा तण परिपक्व झाल्यानंतर ब्रश कटर मारून तण कापणे आणि तणाचेंही जमीनीखालील अवशेष जमीनीखालीच ठेवणे हा पर्याय या शेतीमध्ये त्यांनी सुचवला. 

कारण जसं पिकांचे जमीनीखालील अवशेष जमिनीला फायद्याचे ठरतात त्याप्रमाणेच तणांचेसुद्धा जमीनीखालील अवशेष जमिनीला फायद्याचे ठरतात. सोबतच तणांचे आणि पिकांचे सहजीवन शेती करताना फायद्याचे असते असं हे तंत्रज्ञान सांगतं. ज्यामध्ये आपल्या पिकांवर ज्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यातील बऱ्याचशा किडी किंवा अळ्या या तणांवर जगतात. 

आपण शेतातील तण निर्मूलन केले तर त्याच किडी किंवा अळ्या आपल्या पिकांना लक्ष्य करतात. त्यामुळे तण असलेल्या शेतामध्ये पिकांचे कमी नुकसान होत असल्याचं या तंत्रज्ञानाच्या वापरातून लक्षात आलं आणि तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडे वाटचाल सुरू झाली. याप्रमाणे आता तण पूर्णपणे शेतातून काढून न टाकता परिपक्व झाल्यानंतर तणांवर तणनाशक मारणे किंवा ब्रश कटरने तण कापणे हा पर्याय शेतकऱ्यांना सुचवला जातो.

अशा पद्धतीने विना नांगरणी शेती तंत्रज्ञान आता महाराष्ट्रातील अनेक शेतकरी अवगत करू लागले आहेत. मराठवाड्यातील पैठण तालुक्यातील दीपक जोशी यांनी आपल्या शेतात मागील काही वर्षांपासून हे तंत्रज्ञान वापरास सुरूवात केली आणि यामुळे त्यांच्या कोरडवाहू जमीनीतून सुद्धा चांगले पीक आले आहे. यासोबतच मातीमध्ये पाण्याचा निचरा चांगला झाला, कमी पाण्यात रब्बी पिकांनी चांगले उत्पन्न दिल्याचे अनुभव जोशी यांना आले आहेत. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी