कोल्हापूर जिल्हा कृषी, औद्यागिक क्षेत्रात प्रगत जिल्हा आहे. जिल्ह्यात पश्चिमेपासून से पूर्वपर्यंत व उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत पर्जन्यमान, हवामान यामध्ये विविधता आहे. पश्चिमेकडे पश्चिम घाटामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असून, जस-जसे पूर्वेकडे जाऊ तसे पर्जन्यमान कमी-कमी होत जाते.
जिल्ह्यातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी उसाचे क्षेत्र जास्त आहे. उसाचे उत्पादन वाढविण्याकरिता शेतकरी रासायनिक खतांचा वापर करत आहेत. पाण्याचाही असंतुलित वापर करत आहेत. त्यामुळे काही भागातील जमीन ही क्षारपड बनत चालली आहे. शेतकऱ्यांनी याकडे गांभीर्यपूर्वक पाहणे आवश्यक आहे.
उत्पादकता वाढवताना जमीन पाणी, हवा यांचे प्रदूषण होणार नाही, यादृष्टीने शाश्वत शेती करणे ही काळाची गरज आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी जमिनीच्या आरोग्याची तपासणी करून जमीन आरोग्य पत्रिकेत दिलेल्या शिफारशीनुसार रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांचा वापर करणे, शेणखत, गांडुळखत यांचा वापर करणे आवश्यक आहे.
ऊसतोड झाल्यानंतर शेतामध्ये शिल्लक राहिलेला उसाचा पाला जिल्ह्यातील बहुतांश लोक पाचट जाळत आहेत, त्यामुळे हवेचे प्रदूषण होत आहे. उसाचे पाचट न जाळता ते कुट्टी करून शेतामध्ये कुजवल्यास त्यापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत पिकाला उपलब्ध होते. त्याचबरोबर मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढते.
तणांचाही बंदोबस्त होती एकरी अंदाजित ४ ते ५ टन उसाचे पाचट तयार होते. ते शेतामध्ये योग्यरीत्या कुट्टी करून कुजवल्यास अंदाजित २ ते ३ टन सेंद्रिय खत उसाला उपलब्ध होते. यामुळे जमिनीचे आरोग्यही सुधारते.
त्याचबरोबर आपण उसाच्या लागणीपूर्वी हिरवळीच्या खतांचा ताग किंवा धैंचा यांचा वापर केल्यास हेक्टरी अंदाजित ८० ते ९० किलो इतका नत्र जमिनीमध्ये पिकास उपलब्ध होतो. तसेच बायोगॅस युनिटमधून मिळणारी स्लरी हीदेखील पिकाला उपयुक्त आहे. ठिबक सिंचनाद्वारे पिकालाही देऊ शकतो.
या सर्व गोष्टींचा विचार करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना पाचट कुट्टी मशीन/मल्चर/sugarcane thrash cutter ही नाविन्यपूर्ण योजना यावर्षी राबविण्यात येणार आहे. या योजनेतून ५० टक्के किंवा १ लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
यावर्षी जिल्ह्यात एकूण ३० पाचट कुट्टी मशीनचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हिरवळीच्या खतांचा वापर करावा, या उद्देशाने ७५ टक्के अनुदानात डी. एम. एस. स्वामीनाथन कृषी भू-संजीवनी या योजनेतून ताग/धैंचाचे बियाणे पुरविण्यात येणार आहे.
त्याचबरोबर पर्यायी खतांचा वापर वाढावा, यादृष्टीने मागणीनुसार जिल्हा परिषद कृषी विभागाच्या गांडूळखत निर्मिती प्रकल्पातून गांडूळखत उत्पादित करून ५० टक्के अनुदानावर उत्तम दर्जाचे गांडूळखत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना/महिला बचतगट/शेतकरी गट यांना प्रशिक्षण आवश्यक असल्यास त्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ५० टक्के अनुदानावर स्लरी फिल्टर युनिट, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप इत्यादी योजनांचा लाभ दिला जाणार आहे. शेतकऱ्यांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा आणि शाश्वत शेतीतून आपला विकास साधावा.
अभयकुमार चव्हाणकृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर
अधिक वाचा: Soil Health पेरणीपूर्वी मातीच्या तब्येतीची तापसणी केली का?