दिवाळीत लक्ष्मीपूजनला विशेष महत्त्व आहे. यानिमित्त आपल्या विविध व्यवसाय, उद्योगांच्या ठिकाणी तसेच घरगुती लक्ष्मीपुजनासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. कऱ्हाड बाजारपेठेत रविवारी लक्ष्मीपुजनादिवशी झेंडूच्या फुलांचे दर गगनाला भिडले होते. बळीराजावर लक्ष्मीची कृपा झाल्याचे झेंडूच्या फुलाला सुवर्णझळाळी मिळाल्याचे पाहायला मिळाले.
येथील दत्त चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा परिसरात दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची विक्री करण्यासाठी दाखल होतात. यावर्षी दिवाळीमध्ये सलग तीन दिवसांपासून झेंडूच्या फुलांना कमी-जास्त मागणी असल्याचे दिसून आले. यामध्ये दिवाळीच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी झेंडूच्या फुलांना सुमारे ५० ते ६० रुपये किलोचा दर मिळाला. तर लक्ष्मीपुजनादिवशी बाजारपेठेत झालेली झेंडूची कमी आवक व तसेच वाढती मागणी पाहता, झेंडूच्या फुलांचा दर प्रतिकिलो १०० ते १२० रुपयांपर्यंत वाढला होता.
दिवाळीमध्ये लक्ष्मीमाता शेतकऱ्यांवर प्रसन्न झाल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळाले. लक्ष्मीपूजनासाठी दरम्यान, आवश्यक केरसुणी व दीपावलीच्या अन्य खरेदीसाठीही गृहिणी व नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी येथील बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाली. यानिमित्त शेतकऱ्यांसह व्यापारी, दुकानदार यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले. तर ग्राहकांनी ग्राहकांमध्ये मोठा उत्साह असल्याचे दिसून आले. एकंदरीत, लक्ष्मीपूजनाला बाजारपेठेत उत्साह पाहायला मिळाला.