पावसाळा सुरू झाल्यानंतर पालेभाज्या मालाची आवक वाढलेली असली तरी पावसामुळे शेतमाल ओला झाल्याने कोरड्या मालाला चांगला बाजारभाव मिळत आहे. बुधवारी (दि. १२) सायंकाळी बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीरला लिलावात साडेबारा हजार रुपये शेकडा (१२५ रुपये प्रति जुडी) असा बाजार भाव मिळाला तर कोथिंबीरपाठोपाठ मेथी, कांदापात व शेपू भाजी ५० रुपये प्रति जुडी दराने विक्री झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून कोथिंबिरीचे भाव तीनदा वाढले आहेत.
पालेभाज्यांचे दर टिकून असल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पावसामुळे शेतमाल ओला होत असल्याने ओलसर शेत मालाला बाजार मिळत नाही. मात्र, कोरड्या शेतमालाला ग्राहकांकडून मागणी असल्याने आवक वाढल्यानंतर देखील बाजार टिकून असल्याचे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले.
पालेभाज्यांचे बाजारभाव सद्य:स्थितीत टिकून असल्याने दैनंदिन रोजच्या जेवणात लागणाच्या हिरव्या पालेभाज्या खरेदीसाठी सर्वसामान्य नागरिकांना खिशाचा विचार करावा लागत आहे.