प्रवीण जंजाळ
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील बाजार समितीच्या मार्केटमध्ये कांदा बियाण्याला लिलावात प्रतिक्विंटल ३५ हजार १०० रुपयांचा दर मिळाला. लिलावाचा प्रारंभ व्यापारी विकास चव्हाण यांच्या हस्ते झाला.
आठ दिवसांपूर्वी कांदा बियाणाला प्रतिक्विंटल फक्त १५ ते १९ हजारांचा दर होता; परंतु, अचानक दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. तसेच येत्या काही दिवसांत ५० ते ५५ हजारांपर्यंत दर जाण्याची शक्यता यावेळी व्यापाऱ्यांनी वर्तविली. यावेळी योगेश कोल्हे, अनिल गायकवाड, मधुकर राठोड, प्रकाश चव्हाण, भाऊसाहेब राठोड यांच्यासह वडनेर, जैतखेडा, मुंडवाडी, ब्राह्मणी गराडा, चिकलठाण येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, कांद्याच्या प्रतिहेक्टरी उत्पादनवाढीसाठी उच्च प्रतीच्या बियाणाची आवश्यकता असते. पर्यायी कांदा बीजोत्पादन हे अतिशय महत्त्वाचे ठरते. कांदा बियाणाच्या उत्पादनासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो. पहिल्या वर्षी मूलभूत किंवा पैदासकार बियाणापासून मातृकंद तयार करतात. नंतर दुसऱ्या वर्षी या मातृकंदापासून बिजोत्पादन घेतले जाते.
हेही वाचा - शेळीपालनात उत्पन्नाची हमी; वर्षभर मागणी असलेला शेतीपूरक व्यवसाय