मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणातून ३८० पेट्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. ४ ते ८ डझनच्या पेटीला ७ हजार रुपयांपासून १२ हजार रुपयांपर्यंत विक्रमी भाव मिळाला आहे. १० फेब्रुवारीपासून आवक वाढणार असून, यावर्षी चार महिने मुबलक आंबे उपलब्ध होणार आहेत.
कोकणात हापूसचे पीक चांगले आले आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी आवक वाढली आहे. ३८० पेट्यांची आवक झाली असून, त्यामध्ये देवगडवरून २५० पेट्या, रत्नागिरीमधून ८० व रायगडमधील बानकोट परिसरातून जवळपास ६० बॉक्सची आवक झाली आहे.
अधिक वाचा: थंडीमुळे आंबा पिकाला येतोय पुनर्मोहर; कसे कराल व्यवस्थापन
नवीन वर्षाच्या अखेरीस नियमित आवक सुरू झाल्यामुळे बाजार समितीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. होलसेल मार्केटमध्ये ७ ते १२ डझन वजनाच्या पेटीला ७ हजारांपासून पासून १२ हजार रुपये भाव मिळाला आहे. डझनचा भाव १ ते २ हजार रुपये एवढा आहे.
इतर राज्यांतून आवक• यावर्षी १० फेब्रुवारीपासून कोकणातील हापूसची आवक वाढणार आहे.• मे महिन्यापर्यंत चार महिने खवय्यांना कोकणचा हापूस उपलब्ध होणार आहे.• इतर राज्यांमधूनही आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे.
यंदाच्या हंगामातील सर्वाधिक आवक सोमवारी झाली. देवगड, राजापूर, बानकोट परिसरातून मोठ्या प्रमाणात हापूस विक्रीसाठी आला आहे. १० फेब्रुवारीपासून आवक वाढणार असून चार महिने ग्राहकांना हापूस मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. - संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट