चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून रताळ्याची ६० टन इतकी उच्चांकी आवक झाली असल्याची माहिती सभापती विजयसिंह शिंदे यांनी दिली.
कार्तिकी एकादशी असल्याने चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा व जिल्ह्याबाहेरून रताळ्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढू लागली आहे.
वजनाने जड असलेल्या रताळ्यांना मोठी मागणी असून, एका किलोचा भाव ४० रुपये असल्याचे बाजार समितीचे संचालक महेंद्र गोरे यांनी सांगितले.
कार्तिकी एकादशी आणि उपवासाच्या पार्श्वभूमीवर तरकारी मालाची आवक घटून रताळ्याची आवक वाढू लागली आहे.
चाकण मार्केटमध्ये घाऊक बाजारात कर्नाटक व अन्य भागातून रताळी विक्रीसाठी आली होती. रताळ्याला प्रतिकिलो ४० ते ४५ रुपये बाजारभाव मिळाला. किरकोळ बाजारातही रताळ्याची आवक झाली आहे.
भाज्यांचे भावही गडगडले
बाजारात रताळे खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. रताळ्ळ्याप्रमाणे चाकणला फळभाज्यांच्या बाजारात वाटाणा, हिरवी मिरची, गाजर, फ्लॉवर, वांगी, दोडका, कांदा, बटाटा आदींची आवक झाली, दरम्यान, चाकणला पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, पालक व कोथिंबीर यांची किरकोळ आवक होऊनही या भाज्यांचे भावही गडगडले.