सोलापूर कृषी उत्पन्न बाजार-समितीत मागील आठ ते दहा दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात पाच हजारांच्या घरात असलेला दर बुधवारी सहा हजारांवर पोहोचला होता. विशेष म्हणजे पांढऱ्यापेक्षा लाल कांद्याचा दर वाढला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होत आहे.
कांद्या मार्केटमध्ये सोलापूर बाजार समिती नंबर वन आहे. बाराही महिने कांद्याची आवक असते. आजही दररोज सरासरी १५० ते २०० ट्रक कांद्याची आवक आहे. यंदा पाऊस लांबल्याने आणि आंध्र प्रदेश, तेलगंणा, केरळमधून कांद्याची मागणी वाढल्याने दरात वाढत होत आहे.
मागील आठवड्यात पांढऱ्या कांद्याला ५१०० रुपयांचा दर मिळाला होता. सोलापूर बाजार समितीत पांढरा कांदा कमी असतो. १० क्विंटलच्या आतच पांढरा कांदा असतो आणि लाल कांद्याची आवक मोठी असते. दि. २० ऑक्टोबर रोजी १७० ट्रक लाल कांद्याची आवक होती. दर किमान ५१०० रुपये होता. दि. २१ ऑक्टोबर रोजी २०० ट्रकची आवक असून, ५१०० दर होता आणि दि. २३ ऑक्टोबर रोजी १६० ट्रकची आवक असून, दर किमान ५१०० रुपयांवर स्थिर होता. सरासरी दर ही २००० ते २१०० रुपयांवर स्थिर होता. मंगळवारी कांद्याचा दर एक हजार रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे लाल कांदा ६ हजार रुपयांवर पोहोचला आहे.