केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याच्या निर्णयानंतर, शुल्क भरण्याची तयारी नसल्याने आणि परतीचे मार्ग बंद झाल्याने जेएनपीए बंदर परिसरात निर्यातीसाठी २५ कार्गो कंटेनरमधून आलेला ८०० टन कांदा सडला असल्याची धक्कादायक माहिती 'लोकमत'च्या हाती लागली आहे. एकीकडे बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होण्याच्या भीतीने केंद्राने निर्यात शुल्क लावले. मात्र, त्यातून नवा प्रश्न उभा राहत एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा सडल्याची माहिती पुढे आली आहे.
कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याच्या निर्णयाअगोदरच जेएनपीए (जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण) बंदरात निर्यातीसाठी सुमारे २०० कंटेनर आलेले होते. मात्र, अचानक लावलेले ४० टक्के शुल्क भरणे अनेक निर्यातदारांना शक्य नसल्याने, सीमा शुल्क विभागाने कांद्याचे कंटेनर अडवून ठेवले होते. नुकसान टाळण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी ४० टक्के शुल्क भरून कांद्याचे कंटेनर निर्यात केले, तर काहींनी निर्यातीऐवजी कांदा स्थानिक बाजारात विक्रीसाठी पाठविला. मात्र, त्यानंतरही २५ कंटेनरमधून आलेला ८०० टन कांदा सडल्याची माहिती स्वान ओव्हरहेड या निर्यात कंपनीचे मालक राहुल पवार यांनी 'लोकमत'ला दिली.