प्रदीप पोतदारकवठे एकंद : कवठे एकंद तालुका तासगाव परिसरात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सुपर सोनाका अनुष्का, एस. एस. जातीच्या द्राक्षांना मागणी चांगली आहे. १२० ते १८० असणारा दर आता दोनशे ते २४० रुपये प्रति चार किलो पेटी असा मिळत आहे.
मागील महिन्याच्या तुलनेत ४० ते ६० रुपये प्रति पेटी दर वाढला आहे. मात्र आता द्राक्ष माल कमी राहिला असल्याने दर तेजीत आहेत. द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात मात्र द्राक्ष दर तेजीत असल्याने द्राक्षांची गोडी अधिक झाली आहे. मात्र, बहुतांशी द्राक्षे काढणी झाल्याने दरवाढीचा फायदा जेमतेम शेतकऱ्यांनाच मिळत आहे.
द्राक्षाबरोबरच यंदा नव्या बेदाणालाही चांगला दर मिळत आहे. रमजान महिना असल्याने द्राक्ष, इतर फळे तसेच बेदाणा ड्रायफ्रूट अशा पदार्थांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. तासगाव, सांगली मार्केटमधून मुंबई, गोव्यासह इस्लामिक राष्ट्रांमध्ये बेदाणा पाठवला जातो.
स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांची मागणी वाढल्यामुळे द्राक्षाचा दर अंतिम टप्प्यात तेजीत आहे. ढगाळ हवामान, अवकाळी अशा बदलत्या हवामानाचा फटका नेहमी द्राक्ष शेतीला बसला आहे.
यामुळे अडचणीत असणाऱ्या द्राक्ष शेतीला यंदा चांगल्या दराची अपेक्षा होती. मात्र प्रति चार किलो दीडशे रुपये ते १८० रुपये असाच मिळाला. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक ताळमेळ बसणे जिकिरीचे झाले आहे.
मालाची आवक मंदावलीगेल्या आठवडाभरापासून द्राक्ष मालाची आवक मंदावली आहे. उन्हाची तीव्रता ही अधिक असल्याने स्थानिक बाजारपेठेत द्राक्षांची मागणी वाढली आहे. त्यामुळे हंगामाच्या शेवटी दराने थोडीफार उचल घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण आहे.