वाशिम जिल्ह्यात खरीप पेरणी तोंडावर असताना बाजार समित्यांत तुरीच्या दरात घसरण होत असल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपूर्वी १२ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलच्यावर पोहोचले तुरीचे दर आता अपवाद वगळता सर्वच बाजार समित्यांत १२ हजारांच्या खाली घसरले आहेत.
मंगळवारी वाशिमच्या बाजार समितीत जिल्ह्यात सर्वात कमी असे ११ हजार ८५१ रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे कमाल दर तुरीला मिळाले. त्यापूर्वी सोमवारी मंगरुळपीरच्या बाजार समितीत तुरीला कमाल ११ हजार ७८५ रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळाले. देशांतर्गत तुरीचे उत्पादन घटले असतानाच गत हंगामात तुरीच्या क्षेत्रातही लक्षणीय घट झाली होती.
परिणामी, बाजारात तुरीच्या दरात तेजी आली होती. जिल्ह्यांतर्गत बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर १३ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत पोहोचले होते. उत्पादन घटले असताना दरात तेजी आल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता.
तुरीच्या दरात नंतर कमीअधिक प्रमाणात चढउतारही सुरू झाला आणि निवडणुकीपूर्वी तुरीचे दर ११ हजार रुपये प्रती क्विंटलच्या खाली घसरले होते. त्यानंतर तुरीच्या दरात पुन्हा तेजी येऊ लागली आणि तुरीचे दर मागील काही दिवसांतच १२ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलच्यावर पोहोचले होते.
तथापि, मंगळवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीच्या दरात घसरण झाल्याचे दिसले. त्यात या दिवशी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला जिल्ह्यात सर्वात कमी असे ११ हजार ८५१ रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळाले.
तुरीला कोठे किती दर
११८५१ - वाशिम
१२,२८५ - कारंजा
१२,००० - मानोरा
११,७८५ - मंगरुळपीर
वाशिम बाजार समितीत ३ हजार क्विंटलची आवक
जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीच्या दरात घसरण होत असल्याचे दिसत असले तरी तुरीची आवक मात्र वाढली आहे. वाशिमच्या बाजार समितीत मंगळवारी तब्बल ३ हजार क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर कारंजा बाजार समितीतही ७५० क्विंटल तुरीची आवक झाली होती. मंगरुळपीर आणि मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीतही तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याचे दिसून आले.