Join us

हिंगोली मार्केट यार्डाबाहेर हळद विक्रीसाठी लागली एक किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 10:14 AM

आठवडाभरापासून मार्केट यार्डातील व्यवहार होते बंद

नाणेटंचाई आणि लोकसभा निवडणुकीच्या मतदानामुळे आठवडाभरापासून बंद असलेले मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार २९ एप्रिलपासून पूर्ववत सुरू होणार आहेत. त्यामुळे आदल्या दिवशी रविवारी सकाळपासूनच वाहनांची रांग लागली होती.

येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात मागील आठवड्यात हळदीची विक्रमी आवक झाली. हिंगोली, नांदेड, परभणीसह विदर्भातील यवतमाळ, वाशिम, रिसोड भागातील शेतकरी हळद विक्रीसाठी आणत होते. मात्र, मध्यंतरी व्यापाऱ्यांनी नाणेटंचाईचे कारण पुढे करीत काही दिवसांकरिता मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याची मागणी केली होती.

त्यातच २६ एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. दोन बूथ बाजार समिती कार्यालयात असल्यामुळे मार्केट यार्ड बंद ठेवावे लागले. जवळपास आठवडाभरापासून बंद असलेले व्यवहार सोमवारपासून पूर्ववत सुरू होणार आहेत. या दिवशी आवक वाढण्याची शक्यता बाजार समितीने वर्तविली आहे.

मराठवाड्यासह विदर्भातील हळद हिंगोलीच्या संत नामदेव मार्केट यार्डात विक्रीला

■ येथील संत नामदेव मार्केट यार्डात यंदा हळदीला समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे हिंगोलीसह मराठवाड्यातील नांदेड, परभणी तसेच विदर्भातील यवतमाळ, वाशिम, रिसोड, वर्धा जिल्ह्यातून हळदीची आवक होत आहे. गेल्या आठवड्यात गोंदिया जिल्ह्यातील एका महिला शेतकऱ्याने हळद विक्रीसाठी आणली होती.

■ सोमवारी मार्केट यार्डात आवक वाढण्याची शक्यता बाजार समितीने वर्तविली आहे.

सरासरी १५ हजारांचा मिळतोय भाव

■ हळदीला यंदा १४ ते १६ हजारांदरम्यान भाव मिळत आहे. तर सरासरी १५ हजार रुपये भाव राहत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. आता आठवडाभराच्या बंदनंतर मार्केट यार्ड सुरू होणार असल्याने या दिवशी भाव समाधानकारक मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

एक कि.मी. पर्यंत लागली वाहनांची रांग

■ आठवड्यापासून मार्केट यार्ड बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना हळद विक्री करता आली नाही. तर खासगी बाजारात पडत्या भावात मागणी होत होती.

■ त्यामुळे मार्केट यार्ड सुरू होण्याची प्रतीक्षा करण्यात येत होती.

■ सोमवारपासून हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत होणार असल्याने आदल्या दिवशी रविवारीच मार्केट यार्डाबाहेरील रस्त्यावर एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

अवकाळी पावसाची भीती...

शहरासह जिल्ह्यात अधूनमधून होत असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. पावसामुळे शेतात काढून टाकलेली हळद वाळवणे अवघड झाले आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी हळद तयार करून घरी आणली ते आता मार्केट यार्डात विक्रीसाठी आणत आहेत. परंतु, पावसाचे संकट कायम असल्याने विक्रीसाठी आणलेली हळद वाहनात भिजण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे.

हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी

टॅग्स :हिंगोलीपीकशेतीशेतकरीबाजार