संजय लव्हाडे
केंद्र सरकारने जुलै महिन्यासाठी साखरेचा कोटा २४ लाख टन जाहीर केला असला तरी भाव स्थिरच राहणार आहेत. सरकी ढेपच्या दरात मोठी तेजी असून, गहू, ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन सर्व प्रकारचे खाद्यतेल तसेच सोने-चांदीचे दर घसरले आहेत. खाद्यतेल आणि सोयाबीनचा समावेश वायदा बाजारात पुन्हा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
केंद्र सरकारने जुलै महिन्यासाठी साठी देशभरातील कारखान्यांसाठी २४ लाख टन साखरेचा मासिक विक्री कोटा जाहीर केला आहे. याची घोषणा २६ जून रोजी करण्यात आली. मात्र हा कोटा १ जुलैपासून लागू होणार आहे. जुलै २०२३ साठीदेखील, केवळ २४ लाख टन साखरेचा मोफत विक्री कोटा निश्चित करण्यात आला होता; परंतु जून २०२४ साठी २५.५० लाख टन साखरेचा कोटा जारी करण्यात आला.
सोयाबीन तेलाच्या दरात घट
• पामतेल, सोयाबीन तेल आणि तेलबियांचे वायदे व्यवहार पुन्हा सुरू करावेत तसेच खाद्यतेलांवरील आयात शुल्क वाढवावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. खाद्यतेलांवरील आयात शुल्क बऱ्याच काळापासून अत्यंत खालच्या पातळीवर ठेवले गेले आहे.
• सोयाबीनच्या दरात मोठी घट झाली आहे. नवीन पेरणी सुरू होण्यापूर्वीच वायदे बंदी हटवली तर क्षेत्र वाढविण्याचा शेतकऱ्यांचा उत्साह व आकर्षण वाढेल, गेल्या महिन्यात अर्जेंटिनामधील सोया प्रक्रिया प्रकल्पात कामगार संपावर गेले होते. ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये मुसळधार पावसामुळे सोयाबीन गाळप-प्रक्रिया मंदावली आहे.
• यामुळे भारताला सोयाबीन डीओसीची निर्यात वाढवण्याची संधी मिळू शकते. जालनाबाजारपेठेत पामतेल ९८००, सूर्यफूल तेल १०,४००, सरकी तेल १०,१००, सोयाबीन तेल १०,२०० आणि करडी तेलाचे भाव १८,००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
मागणी जास्त उत्पादन कमी
• मागील काही दिवसांपासून सरकी ढेपचे दर घसरले होते. मात्र सध्या मागणी जास्त आणि उत्पादन कमी असल्यामुळे सरकी ढेपच्या दरात पुन्हा तेजी आली आहे.
• जालना बाजारपेठेत सध्या सरकी ढेपचे दर ३२०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. सरकीचे दर ३६०० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
बाजारभाव (कंसात दररोजची आवक)
गहू (३०० पोते) | ₹ २५०० ते ३००० प्रतिक्विंटल |
ज्वारी (१३०० पोते) | ₹ २००० ते ३२०० प्रतिक्विंटल |
बाजरी (१०० पोते) | ₹ २१५० ते २५०० प्रतिक्विंटल |
मका (५० पोते) | ₹ २३५० ते २५५० प्रतिक्विंटल |
तूर (१५० पोते) | ₹ ६००० ते ११,६०० प्रतिक्विंटल |
हरभरा (३५० पोते) | ₹ ६१०० ते ६५५० प्रतिक्विंटल |
मूग (आवक नाही) | ₹ ७००० प्रतिक्विंटल |
उडीद (१० पोते) | ₹ ९००० ते ९३०० प्रतिक्विंटल |
सूर्यफूल (५ पोते) | ₹ ४४०० ते ४५०० प्रतिक्विंटल |
सोयाबीन (१५०० पोते) | ₹ ४००० ते ४४२५ प्रतिक्विंटल |
गूळ (१५० भेली) | ₹ ३२४० ते ४४०० प्रतिक्विंटल |
गव्हाच्या दरात चढउतार
● गव्हाच्या भावात काहीशी चढउतार सुरु आहे. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ४०० ते २ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
● सोने-चांदीच्या दरात बऱ्याच दिवसांपासून चढ-उतार बघायला मिळत आहेत. सध्या सोने-चांदीच्या दरात किंचित मंदी आली आहे, मात्र सोमवारी पुन्हा तेजी येण्याची दाट शक्यता आहे. जालना बाजारपेठेत सोन्याचे दर ७२ हजार रुपये प्रतितोळा आणि चांदीचे दर ८९,५०० रुपये प्रतिकिलो असे आहेत.