Join us

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील विक्रमी १२२५ ट्रक कांद्याची आवक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 2:52 PM

Onion Market कांदा बाजारभाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील विक्रमी १२२५ ट्रक कांद्याची आवक झाली होती. निर्यातबंदीच्या निर्णयामुळे भाव कमी होईल म्हणून शेतकरी धास्तावून गेला आहे. त्यामुळे कच्चा माल बाजारात मोठ्या प्रमाणात आला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील विक्रमी १२२५ ट्रक कांद्याची आवक झाली होती. निर्यातबंदीच्या निर्णयामुळे भाव कमी होईल म्हणून शेतकरी धास्तावून गेला आहे. त्यामुळे कच्चा माल बाजारात मोठ्या प्रमाणात आला आहे. त्यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे मागील आठवड्यात ५५०० हजारांपर्यंत गेलेला दर सोमवारी ४१०० रुपयांवर पोहोचला होता. सरासरी दरही २८०० वरुन २१०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील १५ दिवसांपासून सरासरी ५०० ट्रक कांद्याची आवक सुरू आहे. या काळात दर ही ५००० ते ५५०० रुपयांवर स्थिरावला होता. सरासरी दरही २५०० ते २८०० रुपये मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत होता. दरम्यान, शुक्रवार केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आणि त्यात गुरुवारी सुमारे ८०० ट्रक कांद्याची आवक होती.

गुरुवारी लिलावानंतर गाड्यामध्ये कांदा भरण्यास विलंब झाला. शुक्रवारी पहाटेपर्यंत माथाडी काम करीत होते. त्यामुळे शुक्रवारी लिलावाला आलेला माल उतरविणे शक्य नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांचा माल तसाच पडून राहिला आणि बाजार समितीत प्रचंड गदारोळ झाला. मात्र शेवटी शुक्रवारी आलेल्या कांद्याचा लिलाव शनिवार करण्याचा निर्णय घेतला. शनिवारही दर स्थिर राहिला होता. मात्र, सोमवारी अचानकच आवक वाढल्याने कांद्याचा दर पडला आहे. त्यामुळे सोमवारी दिवसभर मार्केट यार्डात वाहतुकीची कोंडी झाली होती.

मागील वर्षीही १६०० ट्रकची विक्रमी आवककांद्याची आवक वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यात भुसार मालाच्याही गाड्या असतात. त्यामुळे सोमवारी यार्डात सर्वत्र गाड्याच दिसत होत्या. मागील वर्षीही जानेवारी महिन्यात एकाच दिवशी १५०० ते १६०० ट्रक कांद्याची आवक होती. तेव्हा हीच परिस्थिती होती. शेतकऱ्यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन कांदा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन उपसभापती श्रीशैल नरोळे यांनी केले आहे.

आज कांदा मार्केट बंदसोमवारी आलेल्या कांद्याच्या लिलावाला विलंब झाला. लिलावानंतर गाड्या भरून पाठविण्यास एक दिवस लागणार आहे. त्यामुळे आडत व्यापाऱ्यांनी मंगळवारी कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि बुधवारच्या लिलावासाठी मंगळवारी रात्री १० वाजल्यानंतर गाड्या यार्डात सोडण्यात येईल, असेही बाजार समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

रानातील कच्चा कांदा थेट यार्डात. कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी धास्तावला आहे. पुढे दर एकदम खाली आल्यास केलेला खर्चही निघणार नाही, म्हणून रानात कांदा काढून न वाळवता मार्केटला आणत आहेत. कच्च्या मालामुळे दर कमी मिळत आहे. शिवाय चांगल्या मालालाही फटका बसत आहे. रविवारी सुटी असल्याने सोमवारी कांद्याची आवक मोठी होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक होईल, असे वाटले नव्हते. मात्र, गडबड करून कच्चामाल विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे दर कमी होत आहे. त्यात निर्यातबंदीचाही परिणाम झालेला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी कांदा पूर्णपणे वाळवूनच विक्रीसाठी आणावा. - केदार उंबरजे, व्यापारी संचालक

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डसोलापूरशेतकरीकेंद्र सरकारपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती