Join us

Turmeric Market बारा वर्षानंतर रेकॉर्ड ब्रेक; राजापुरी हळदीला सोन्याचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 10:45 AM

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला हंगामात सोन्याचा भाव मिळताना दिसत आहे. बुधवारी निघालेल्या हळदीच्या सौद्यात राजापुरी हळदीस ऐतिहासिक ६१ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला हंगामात सोन्याचा भाव मिळताना दिसत आहे. बुधवारी निघालेल्या हळदीच्या सौद्यात राजापुरी हळदीस ऐतिहासिक ६१ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

बाजार समिती स्थापन झाल्यापासूनचा हा ऐतिहासिक दर राहिला आहे. आवक कमी असल्यामुळे हळदीला सरासरी १८ ते २५ हजारांपर्यंत दर मिळाला आहे. दर तेजीत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सांगलीमार्केट यार्डात बुधवारी एन. बी. पाटील-शिरगावकर यांच्या अडत दुकानामध्ये अरिहंत बाबू गुळण्णावर, रा. यरगट्टी व बसाप्पा पराप्पा कोकटनूर, रा. यरगट्टी या शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणली होती.

या हळदीस सौद्यामध्ये उच्चांकी ६१ हजार रुपयांचा दर देऊन मनाली ट्रेडिंग कंपनी यांनी खरेदी केली. सध्या हळद या शेतीमालास उच्चांकी भाव मिळत असून, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुजय शिंदे, सभापती, सचिव महेश चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सौदे निघाले. यावेळी मनोहर सारडा, कौशल शहा, संदीप मालू, विवेक शहा, बाळू मर्दा, भरत अटल, अविनाश अटल, राजेश पटेल आदी व्यापारी उपस्थित होते.

बारा वर्षांनंतर दर वाढले - २०१०-११ यावर्षी हळदीला प्रतिक्विंटल ३२ हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळाला होता. यावेळी सरासरी दरही १५ ते २० हजार रुपये क्विंटल दर होता; पण त्यानंतर हळदीचे दर खूपच कमी झाले. गेल्या वर्षी तर प्रतिक्विंटल सहा ते नऊ हजार रुपये दर होता.यामुळे हळद लागण कमी झाली. म्हणूनच सध्या हळदीचे दर वाढले आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हळद विक्रीसाठी सांगलीच्या वसंतदादा मार्केट यार्डामध्ये आणावी, असे आवाहन एन. बी. पाटील-शिरगावकर अडत दुकानदार नितीन पाटील यांनी केले.

टॅग्स :शेतकरीबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसांगलीशेती