उटगी (ता. जत) येथील शेतकरी राजू आमसिद्ध लिगाडे यांच्या पिवळ्या ड्रॅगनला २४८ किलोला ३८ हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळाला आहे. आंबट, खारट व थोडीशी गोड चव असलेल्या ड्रॅगन फळाची चव न्यारीच आहे. जतसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना ड्रॅगन 'बूस्टर" ठरले आहे.
जतसारख्या दुष्काळी, कमी पाणी, अनुकूल हवामान, खडकाळ जमिनीवर येणारे हे पीक असल्याने उजाड माळरानावर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी ड्रॅगनच्या बागा फुलविल्या आहेत. जत पूर्व भागातील उटगी येथील प्रयोगशील शेतकरी राजू लिगाडे यांनी दोन वर्षांपूर्वी पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन रोपांची लागवड केली होती. एकूण दोन हजार रोपे लागवड केली आहे. पिवळ्या ड्रॅगन फळाची टिकवण क्षमता लाल ड्रॅगन फळापेक्षा जास्त असल्याची जाणीव राजू लिगाडे यांना झाल्याने पिवळ्या ड्रॅगन फळाकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. लिगाडे यांनी प्रथमच २०१४ साली लाल ड्रॅगन फळाची लागण केली होती.
ड्रॅगन फळ त्वचेसाठी व अनेक आजारांसाठी उपयुक्त असे ओळखले जाते. शासन ड्रॅगन शेतीस हेक्टरी १ लाख ६० हजारांचे अनुदान देत असल्याने शेतकऱ्यांचा ड्रॅगन शेतीकडे जास्त कल दिसून येत आहे. पुणे येथील गुलटेकडी छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे पिवळ्या ड्रॅगन फळाची प्रथमच आवक झाली आहे. त्यांच्या पिवळ्या ड्रॅगनला २४८ किलोला ३८ हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळाला आहे.
एका फळात १०२ कॅलरीएका ड्रॅगन फळामध्ये १०२ कॅलरी ऊर्जा असते. ड्रॅगन फळात व्हिटॅमीन सी मोठ्या प्रमाणात असते. यासोबतच कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि ९० टक्के पाणी असते.
या आजारावर लाभदायीकोलेस्ट्रॉल, पोटाचे विकार व पचनशक्ती मजबूत होते. संधिवात, सांधेदुखी त्रास असणाऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटचे सेवन करावे. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फळ अधिक फायदेशीर असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
शेतात लाल व पिवळ्या ड्रॅगन फळाचे उत्पादन घेतो. बंगळूरू हैदराबाद, मुंबई, केरळ, सोलापूर, कोल्हापूर येथे ड्रॅगन फळाची विक्री केली आहे. विशेष मधुमेहाच्या रुग्णांची ड्रॅगन फळास चांगली मागणी आहे. फळ खाण्यास रुचकर आणि कमी साखर असलेले पाणीदार फळ आहे. - राजू लिगाडे शेतकरी, उटगी