रवींद्र अमृतकर
बाजारात इतर फळांची आवक वाढल्याने केळीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे कन्नड तालुक्यातील नागद परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील नागद भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात केळीची लागवड करतात. हा भाग केळी लागवडीसाठी प्रसिद्ध असल्याने राज्यातील विविध शहरांमधील व्यापारी येथे केळीची खरेदी करण्यासाठी येतात.
व्यापारी जागेवरच केळीची खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च वाचला. शिवाय चांगला भाव मिळत असल्याने या भागातील केळीची लागवड वाढली. या भागातील शेतकऱ्यांनी गतवर्षी १ हजार २०० हेक्टरवर केळीची लागवड केली; परंतु कमी पावसामुळे विहिरींची पाणी पातळी तळाला गेली.
अशातही शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीने केळीच्या बागा वाचविल्या; परंतु आता केळीला भावच नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या केळीला ३०० ते ६५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकासाठी केलेला खर्चसुद्धा निघत नाही. त्यामुळे बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बाजारात टरबूज, आंबे, चिकू, द्राक्ष या फळांची आवक वाढल्याने केळीचे दर घसरल्याची चर्चा आहे.
शेती नांगरणे, सरी पडणे, केळी रोप किंवा बियाणे खरेदी करून लागवड करणे, ठिबक संच, रासायनिक खते, शेणखत, फवारणीसाठी औषधी यासाठी खर्च करणे, शिवाय निंदनी, वखरणी, आदी कामे करूनही समाधानकारक पैसा मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
किरकोळ बाजारात मात्र चढ्या दराने होतेय विक्री
केळीच्या लागवडीसाठी नांगरटी, मशागत, शेणखत, प्रतिरोप १६ रुपये खर्च व नंतर रासायनिक खते यांचा विचार करता कमीत कमी एक हजार रुपये प्रति क्चिटलचा दर मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित असते; परंतु या पिकावर रोग पडल्यास हा दरही शेतकऱ्यांना परवड नाही.
अशात व्यापारी शेतकऱ्यांकडून ३०० ते ६५० रुपये प्रति क्विंटलने खरेदी करून किरकोळ बाजारात मात्र ५० रुपये प्रति डझनने त्याची विक्री करीत असल्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. या दरावर शासनाचे नियंत्रण नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
हेही वाचा - निंबोळी अर्काच्या वापरामुळे वाचतो २५ टक्क्याहून अधिक कीटकनाशकांचा खर्च