काही दिवसांपूर्वी बाजारात ४० ते ४५ रुपये ठोक दराने विकल्या जाणाऱ्या भेंडीचे दर आता वीस ते पंचवीस रुपयांवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे तोडणी अन् वाहतूक खर्चही निघत नसल्याचे भेंडी उत्पादकांचे म्हणणे आहे.
धाराशीव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील काटी धामणगाव रस्त्यालगत उषा चव्हाण यांची शेती असून, त्यांनीही मे महिन्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई काळात योग्य नियोजन करून वीस गुंठे जमिनीत भेंडीची लागवड केली. त्यासाठी त्यांनी वीस हजार रुपये खर्च केले. भेंडीची जोपासना उत्तम प्रकारे केल्यानंतर भेंडीची तोडणी सुरू झाली. त्यावेळी बाजारात ४० रुपये ते ४५ रुपये भाव मिळत होता.
मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू झाल्याने पालेभाज्यांचे भाव ढासळले असून, सध्या बाजारात भेंडीला वीस ते पंचवीस रुपये भाव मिळत आहे. यामुळे तोडणी अन् वाहतुकीचा खर्चही परवडत नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
दर दोन दिवसाला भेंडीची तोडणी केली जात असून, एका तोड्याला साधारण १०० ते ११० किलो भेंडीचे उत्पादन मिळते. उत्पादित केलेली भेंडी त्या पुणे बाजारपेठेत विक्रीस पाठवतात.
विशेष म्हणजे, उषा चव्हाण, त्यांचे पती बिभीषण चव्हाण, मुलगा, सून अशी घरातील सर्वच मंडळी तोडणीची कामे स्वतः करून मजुरीची बचत करीत आहेत. मात्र, भावात घसरण झाल्याने भेंडीची शेती तोट्यात आली असून, लागवड अन् तोडणीचा खर्चही पदरात पडत नसल्याचे उषा चव्हाण यांनी सांगितले.
कृषी पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील भेंडीची आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
23/07/2024 | ||||||
पाटन | --- | क्विंटल | 3 | 2500 | 3000 | 2750 |
खेड-चाकण | --- | क्विंटल | 140 | 2000 | 3000 | 2500 |
मुरबाड | हायब्रीड | क्विंटल | 39 | 3500 | 4500 | 4000 |
कळमेश्वर | हायब्रीड | क्विंटल | 18 | 1545 | 2000 | 1865 |
पुणे | लोकल | क्विंटल | 501 | 1200 | 4000 | 2600 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 5 | 2000 | 4000 | 3000 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 78 | 4000 | 5000 | 4500 |
कामठी | लोकल | क्विंटल | 5 | 1500 | 2500 | 2000 |