सौद्यामधील बेदाणा खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी ४० दिवसात पैसे द्यावेत, अशी सांगलीच्या अडत संघटनेची मागणी आहे. पण, तासगावमध्ये स्वतंत्र अडत संघटना करून तेथील अडत्यांनी ५१ दिवसात पैसे देण्याची व्यापाऱ्यांना मुदत दिली आहे.
पैसे देण्यावरून तासगाव आणि सांगलीच्या अडत्यांमध्ये फूट निर्माण झाली आहे. गुजरात राज्यातील उंझा बाजार समितीमध्ये जिरा बाजाराची हजारो कोटींची उलाढाल रोखठोक होते. सांगलीतील हळद बाजारपेठेत २७ दिवसात अडत्यांना पैसे दिले जात आहेत.
गुळाचे सौदे झाल्यानंतर २० दिवसात पैसे मिळत आहेत. असे असेल तर बेदाणा सौदे झाल्यानंतर अडत्यांना ४० ते ५० दिवसात पैसे का दिले जात आहेत? बेदाणा सौदे आणि तेथील पैसे देण्यावरून तासगाव आणि सांगली अशी अडत्यांमध्येच फूट पडली आहे.
या फुटीचा फायदा पुन्हा व्यापाऱ्यांना होणार आहे. या फुटीत अडते आणि शेतकऱ्यांनी आर्थिक कोंडी होणार आहे. याकडे सांगली आणि तासगाव बाजार समितीच्या प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सांगली अडत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेदाणा सौदे झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी ४० दिवसात पैसे दिले पाहिजेत, अशी भूमिका मांडली आहे.
दुसऱ्या बाजूला तासगाव येथील अडत्यांनी वेगळी अडत संघटना स्थापन करून ५१ दिवसात व्यापाऱ्यांनी पैसे दिले पाहिजेत, अशी भूमिका मांडली आहे. तासगाव आणि सांगलीच्या अडत्यांनी दोन वेगवेगळ्या भूमिका मांडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
तासगावची संघटनातासगाव-सांगली बेदाणा असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक बाफना व माजी सचिव जगन्नाथ घणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव बेदाणा अडत संघटनांची समिती नेमली आहे. यामध्ये पंजाबराव माने-पाटील, सुदाम माळी, विनायक हिंगमिरे, सिद्धार्थ खुजट, भूपाल पाटील, विकास शहा, तुषार खराडे-पाटील यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांना तीस दिवसात पैसे द्याबेदाणा विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना ३० दिवसात पैसे मिळाले पाहिजेत. ही जबाबदारी सांगली व तासगाव बाजार समित्यांची आहे. अडत्यांची काय भूमिका आहे, याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. पैसे घेण्यासाठी दीड ते दोन महिने थांबणे शक्य नाही. तात्काळ पैसे दिले पाहिजेत, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली.