पलूस : पलूस व वाळवा तालुक्यातील आले शेती धोक्यात आली आहे. आले पिकाच्या दरात आजवरचा सर्वांत निच्चांकी भाव मिळत आहे.
आल्याचा आजचा दर अवघा १५ रुपये किलो झाल्याने शेतकरी हवालदिल आहे. मात्र, व्यापारी मालामाल बनत शेतकऱ्यांची लूट करत आहेत.
अशा परिस्थितीत आले उत्पादक शेतकरी शासनांकडे मदत मिळावी, अशी मागणी करत आहेत. पलूस, वाळवा या परिसरात उसाला पर्यायी पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात आल्ले शेतीकडे वळाला आहे.
आले पिकास शेतकऱ्यास २०२२-२३ ला प्रतिकिलो १७५ रुपये भाव तर २०२३-२४ मध्ये तो ११५ पर्यंत मिळाला होता. २०२४-२५ ला हाच दर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ५५ रुपयांवर आला होता. त्यात घसरण होत आल्ल्याचे भाव कमी होत आहेत.
जानेवारी-फेब्रुवारीमध्ये १५ ते २० रुपयांवर आल्याने बळिराजा हतबल आहे. मोठी लागवड झाल्याने व्यापारीही आले १५ रुपयांपेक्षा कमी दराने खरेदी करत आहेत.
सध्या आल्याला प्रतिकिलो ४० ते ५० रुपये दर मिळत आहे. पण, व्यापारी शेतकऱ्यांकडून १५ ते २० रुपये किलोंनी खरेदी करत आहेत.
शेतकऱ्यांनी घाबरून जाण्यापेक्षा आल्याची खोडवा पीक घ्यावे. यावर्षी अतिरिक्त लागवड झाल्याने बाजारात आल्याची आवक जास्त आहे म्हणूनच शेतकऱ्यांना फटका शेतकऱ्यांना बसत आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाची लूट थांबवावी, अशी मागणी आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी काही तरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. - मोहन चव्हाण, आले उत्पादक शेतकरी, बोरगाव (ता. वाळवा)