ओणम, रक्षाबंधन आणि कृष्ण जन्माष्टमी या आगामी सणासुदीच्या काळात साखरेची वाढती मागणी लक्षात घेऊन, ऑगस्ट २०२३ या महिन्यासाठी २ लाख मेट्रिक टन (ऑगस्ट, २०२३ महिन्यासाठी आधीच नियतवाटप केलेल्या २३.५ एलएमटीव्यतिरिक्त) अतिरिक्त कोट्याचे नियतवाटप करण्यात येत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्ध होणारी अतिरिक्त साखर देशभरात वाजवी किमती सुनिश्चित करेल.
गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेच्या किमतीत २५% वाढ होऊनही, देशातील साखरेची सरासरी किरकोळ किंमत प्रति किलो ४३.३० रुपये इतकी राहिली असून ती याच मर्यादेत राहण्याची शक्यता आहे. गेल्या १० वर्षात देशात साखरेच्या किमतीत २% पेक्षा कमी वार्षिक महागाई दर राहिला आहे.
चालू साखर हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) २०२२-२३ मध्ये, इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे ४३ एलएमटी साखर वळवल्यानंतर भारतात ३३० एलएमटी साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखरेचा देशांतर्गत खप सुमारे २७५ एलएमटी राहण्याचा अंदाज आहे.
सद्यस्थितीत, चालू साखर हंगाम २०२२-२३ च्या उर्वरित महिन्यांसाठी देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारताकडे पुरेसा साखरेचा साठा आहे आणि या हंगामाच्या अखेरपर्यंत म्हणजे ३०.०९.२०२३ पर्यंत ६० एलएमटी (अडीच महिन्यांसाठी साखरेची मागणी पूर्ण करण्यासाठी पर्याप्त) इष्टतम शेष माल उपलब्ध असेल.
साखरेच्या किमतीतील अलीकडील वाढ लवकरच योग्य स्तरावर येईल. पुढील हंगामापूर्वी जुलै-सप्टेंबर दरम्यान दरवर्षी किमती वाढतात आणि नंतर ऊस गाळप सुरू झाल्यावर कमी होतात. त्यामुळे साखरेची दरवाढ अत्यंत नाममात्र आणि अल्प कालावधीसाठी आहे.