Join us

गारपीटीतील नुकसानीमुळे बाजारसमितीत कांदा आवक रोडावली; बाजारभाव वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 11:29 AM

अवकाळी पाऊस आणि गारपीटीनंतर लासलगाव विंचूर बाजारसमितीत कांदा बाजारभाव वधारले आहेत.

उत्तर व मध्य महाराष्ट्रात झालेली गारपीट व वादळी पावसामुळे कांद्यासह शेतातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काल दिनांक २६ नोव्हेंबर रोजी नाशिक जि्ल्ह्यातील निफाड, चांदवड परिसराला गारपीटीने झोडपून काढले होते. तर येवला, देवळा, सटाणा, मालेगाव या कांदा उत्पादन घेणाऱ्या भागांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे आज सकाळी लासलगाव आणि विंचूर बाजारसमितीत रविवारच्या सुटीनंतर सुरू झालेल्या कांदा लिलावात अगदी कमी कांद्याची आवक झाली, तर कांदा बाजारभाव शनिवारच्या तुलनेत हजार ते दीड हजार रुपयांनी वधारल्याचे चित्र आहे.

लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनकडून प्राप्त माहितीनुसार शेतात काढून ठेवलेल्या आणि काढणीवर आलेल्या लाल - रांगडा कांद्याचे कालच्या गारपीटीने मोठे नुकसान झाल्याने आगामी काळात कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आज कांद्याच्या भावाने अचानक मोठी उसळी घेतली. केवळ नाशिक परिसरच नव्हे, तर धुळे, नगर, पुणे अशा कांदा उत्पादन घेणाऱ्या परिसरातही पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यातही लाल कांद्याचे जास्त नुकसान झाले आहे.

लाल कांद्याचे नुकसान मोठे चांदवड तालुक्यातील वाहेगावचे कांदा उत्पादक शेतकरी निवृत्ती न्याहारकर यांनी सांगितले की रविवारच्या पावसाने सर्वाधिक नुकसान हे लाल कांद्याचे, रांगडा कांद्याचे झाले आहे. अनेकांनी कांदा काढून शेतातच ठेवला होता, तर अनेक शेतकऱ्यांकडील लाल कांदा लवकरच काढणीवर येणार होता. मात्र गारपीटीमुळे आता हा सर्व कांदा खराब झाला आहे. एकदोन दिवसांनी पावसाने उघडीप दिल्यानंतरच कांद्यासह पिकांच्या नुकसानीचे वास्तव समजेल असेही ते म्हणाले.

म्हणून भाव वाढणार मागच्या आठवड्यापासून लासलगाव पिंपळगावसह बाजारसमित्यांमधील लाल कांद्याची आवक हळूहळू वाढत होती, त्यामुळे किरकोळ बाजारातील कांद्याचे दर कमी होताना दिसत होते. मागच्या आठवड्यात उन्हाळी कांद्याला सरासरी ३२०० ते ३४०० रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळत होता. तर लाल कांद्याला साधारण सरासरी ३००० रुपयांचा दर प्रति क्विंटलला मिळत होता. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडील मागच्या आठवड्यातील आकडेवारी नुसार बाजारसमित्यांमधील उन्हाळी कांद्याची आवक घटून लाल कांद्याची आवक वाढत होती. मात्र कालच्या पावसाने आता लाल कांद्याचीही आवक घटणार आहे. 

ज्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला आहे, अशा शेतकऱ्यांकडील जो काही अल्प उन्हाळी कांदा शिल्लक आहे, तोही पावसाळी वातावरण आणि ओलाव्यामुळे खराब होण्याची शक्यता आहे. काही कांदा खराबही झालेला आहे. त्यामुळे आज सोमवारी दिनांक २७ रोजी दोन्ही प्रकारच्या कांद्याचे दर वाढले आहेत.

सध्या केवळ मोठ्या शेतकऱ्यांकडेच उन्हाळी कांदा शिल्लक आहे.  त्याचे प्रमाणही आता केवळ २० ते २५ टक्के शिल्लक आहे. उर्वरित उन्हाळी कांदा व्यापाऱ्यांच्या चाळींमध्ये आहे. त्यामुळे आगामी काळात कांद्याचे भाव वाढले, तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याची शक्यता कमीच असल्याचे निरीक्षण नाशिकमधील एका बाजारसमितीच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे.

लासलगाव बाजारसमितीत आजचे कांदा बाजारभाव

  • एकूण कांदा लिलाव १५८ नग
  • कांदा आवक अंदाजे २५०० क्विंटल 
  • बाजारभाव रूपये प्रति क्विंटल  (किमान-कमाल-सर्वसाधारण)    
  • उन्हाळ कांदा  - ३१०० - ५२३१ - ४५००
  • लाल कांदा      - २००० - ४७०१ - ४२००

 

टॅग्स :कांदागारपीटपाऊसपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीरब्बी