टोमॅटो पाठोपाठ आता सरकार कांदाही सवलतीच्या दरात विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात किमती तिप्पट होण्याच्या भीतीने आजपासून नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) मार्फत केंद्र ग्राहकांना किरकोळ दुकाने आणि मोबाईल व्हॅनद्वारे ₹ २५ प्रति किलो दराने कांदा विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सणासुदीच्या काळात देशांतर्गत पुरवठा सुधारण्यासाठी आणि महागाईला आळा घालण्यासाठी शनिवारी कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यानंतर राज्यभरात शेतकऱ्यांचा रोज वाढला असून नाशिक व पुणे येथील बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलने करण्यास सुरुवात केली आहे.
सरकार आपल्या ३,००,००० टन बफर स्टॉकमधून सवलतीच्या दराने कांद्याची विक्री करेल. ग्राहक व्यवहार (NCCF) आणि नाफेड (NAFED)यांना प्रमुख उपभोग केंद्रांमध्ये खरेदी केलेल्या साठ्याची एकत्रित विल्हेवाट लावण्यासाठी अतिरिक्त खरेदीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रत्येकी १ लाख टन कांदा खरेदी करण्याचे निर्देश दिले.
सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी (PSF) चा एक भाग म्हणून या वर्षी तयार केलेल्या ३,००,००० टन बफरमधून कांदे सोडण्याचा निर्णय घेतला होता. भाजीपाल्यांच्या वाढत्या किमतीच्या ट्रेंडमुळे आतापर्यंत राज्यांमध्ये सुमारे १,४०० टन कांदे पाठवले गेले.