मार्च महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला असून, उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दुपारी बारा वाजेनंतर ऊन तापायला सुरुवात होत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग सकाळीच शेतातील कामे उरकून घेताना दिसून येत आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कमी-जास्त प्रमाणात उन जाणवू लागले आहे. आठवडाभरापूर्वी वादळवारे व हलकासा पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात थोडासा थंडावा निर्माण झाला होता.
परंतु, आता मात्र ऊन तापायला सुरुवात झाली आहे. पहाटे थंडी पडत असली, तरी सकाळी साडेनऊ वाजेपासून ऊन जाणवू लागले आहे. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत चांगलेच ऊन पडत आहे. दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. दुकानदार मंडळी ऊन लागू नये म्हणून दुकानाच्या अवतीभोवती कापड बांधू लागले आहेत.
संबंधित-सकाळ सत्रात कांद्याची आवक घटली, कुठे-काय बाजारभाव मिळाला?
कुरुंदा ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे छोटे-मोठे व्यापारी व्यापाराच्या निमित्ताने कुरुंदा येथे येतात. परंतु, दोन आठवड्यांपासून ऊन चांगलेच तापू लागले आहे. त्यामुळे सकाळीच बाजारपेठेत येऊन खरेदी करून व्यापारी निघून जात आहेत. दुपारच्यावेळी उन्हाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळत आहे.