Join us

Agriculture Export जेएनपीटीवरील निर्यातीचा भार कमी करण्यासाठी कोकणातील या बंदरांमधून निर्यात सुरू करण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 10:42 AM

जेएनपीटी बंदरावर येत असलेला निर्यातीचा भार लक्षात घेऊन आता कोकणाला अॅग्रो हब बनवून कोकणातील बंदरांमधून निर्यात सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

जेएनपीटी बंदरावर येत असलेला निर्यातीचा भार लक्षात घेऊन आता कोकणाला अॅग्रो हब बनवून कोकणातील बंदरांमधून निर्यात सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

त्यासाठी अॅपेडाचे (कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण) संचालक व त्यांच्या पथकाने रत्नागिरीतील जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या बंदराचे सर्वेक्षण केले.

अॅपेडाचे संचालक परशराम पाटील आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी जयगडला भेट दिली. मंगळुरू ते जेएनपीटी यादरम्यानचे कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा आणि कोकण हे अॅग्रीकल्चर कॉरिडॉर देशासाठी महत्त्वाचे आहेत.

सद्यस्थितीत येथील कृषी उत्पादन जेएनपीटी बंदरातून निर्यात होते. त्यामुळे या बंदरावर ताण वाढला आहे. कृषी माल नाशिवंत असतो. निर्यातीला विलंब झाला तर माल खराब होतो. शेतकऱ्यांचे नुकसान होते.

त्यामुळे जेएनपीटी बंदरावरील ताण कमी होणे आवश्यक आहे आणि त्याला पर्याय म्हणून अन्य बंदरातून निर्यात करणे आवश्यक झाले आहे, असे परशराम पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

मंगळुरू ते जेएनपीटी यादरम्यान केवळ कोकणातील जयगड हे एकमेव बंदर जेएसडब्ल्यू कंपनीमुळे वापरात येत आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदरावरील ताण कमी करण्यासाठी जयगड बंदरातून कृषी निर्यात करण्याचा विचार सुरू झाला आहे.

केंद्र सरकारची अॅपेडा आणि राज्य सरकारची मित्र (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर रिफॉर्मेशन) या दोन संस्था संलग्नतेने हा विषय हाताळणार आहेत.

त्यासाठी जेएसडब्ल्यू कंपनीने सहकार्याची भूमिका घेतली आहे. शुक्रवारी त्यांनी व त्यांच्या पथकाने या बंदराचे सर्वेक्षण केले आहे. त्याचा अहवाल तयार झाल्यानंतर निर्यातीबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे समजते.

कोकणात रोजगार वाढतीलजयगडमधून निर्यात सुरू झाली तर साधारण एक हजार कंटेनर येथून जाऊ शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल पडून न राहता वेळेवर बाहेर जाईल. कोकणात रोजगार उपलब्ध होईल. कृषी उत्पादनांना चांगला भाव मिळेल. निर्यातीला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही अॅपेडाचे संचालक पाटील यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा: Mango Export बारामतीचा आंबा पोहोचला लंडन, अमेरिकेच्या बाजारात, प्रति किलो असा मिळाला भाव

टॅग्स :कोकणजेएनपीटीशेतकरीशेती क्षेत्रमहाराष्ट्रराज्य सरकारसरकार