Join us

Agriculture Market Update : ऑस्ट्रेलियामध्ये हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता; हरभऱ्यात मंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 10:37 IST

सध्या बहुतांश वस्तुमालांचे दर स्थिर असून हरभरा सोयाबीन सर्व प्रकारचे खाद्यतेल आणि साखरेच्या दारात मंदी आली. तर सोने चांदीच्या दरात मात्र पुन्हा तेजी आली असून दुसरीकडे बाजारात सीसीआयकडून कापसाची खरेदी सुरू झाली आहे.

संजय लव्हाडे

जालना : विधानसभा निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणीमुळे मागील आठवड्यात बाजारपेठेत ग्राहकी कमी होती. बहुतांश व वस्तुमालांचे दर स्थिर असून हरभरा सोयाबीन सर्व प्रकारचे खाद्यतेल आणि साखरेच्या दारात मंदी आली. सोने चांदीच्या दरात मात्र पुन्हा तेजी आली. बाजारात सीसीआयकडून कापसाची खरेदी सुरू झाली आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत तसेच खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि सोयाबीनची हमीभावाने खरेदी हे निर्णय घेऊनही सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमीच असल्याने भाजपने सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू करू आणि सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव देऊ, असे आश्वासन दिले. त्याचा थोडा परिणाम बाजारात जाणवला.

गेल्या पाच दिवसांत सोयाबीनचे सरासरी दर तीनशे रुपयांनी वाढले; पण, मतदानाच्या आदल्या दिवशी मंगळवारी दर पुन्हा कोसळून ३ हजार ९७५ रुपयांवर आले. जालना बाजारपेठेत सोयाबीनची आवक दिवसेंदिवस कमी होत असून शनिवारी दोन हजार पोते सोयाबीनची आवक झाली. दर ३४५० ते ४३११ रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्यांनी ऑस्ट्रेलियातील हरभरा भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात हरभऱ्याचे दर कमी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जालना बाजारपेठेत हरभऱ्याची आवक दररोज २० ते ५० पोते इतकी असून भाव ४५०० ते ६००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

सोयाबीनप्रमाणेच कापूस उत्पादकांनादेखील ओलाव्याच्या कारणामुळे कमी दरात कापसाची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे हमीभावाने कापूस खरेदीसाठी कापसातील ओलाव्याचे प्रमाण ८ ते १२ टक्क्यांवरून १५ टक्के गृहीत धरण्यात यावे, अशी मागणी उत्पादकांमधून होत आहे. देशभरात सध्या भारतीय कापूस महामंडळाकडून कापसाची खरेदी होत आहे. त्याकरिता मध्यम धाग्याच्या कापसाकरिता ७७२१, तर लांब धाग्याच्या कापसाकरिता ७५२१ रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला.

परंतु कापसात ओलावा अधिक असल्याचे कारण देत सरसकट ७००० ते ७२०० रुपयांनी कापसाची खरेदी केली जात आहे. सी.सी.आय. कडून कापसाची खरेदी सुरू झाली असून भाव ७२३५ ते ७४२१ रुपये प्रति क्विंटल असे आहेत. या अंतर्गत सी.सी.आय. ने शनिवारी १ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली. तर सोमवारपासून सोन्याच्या दरात तेजी आली असल्याचे दिसून आले.

बाजारभाव

कापूस (सीसीआय)७२३५ ते ७४३१उडीद५५०० ते ६०००
गहू २००० ते ४५००सोयाबीन३४५० ते ४३११
ज्वारी२००० ते २७००साखर३८०० ते ३९५०
बाजरी२०५० ते ३०००पामतेल१४४००
मका१८०० ते २२५०सूर्यफूल तेल१४८००
तूर ८४०० ते ८९००सरकी तेल१३६००
हरभरा४५०० ते ६०००सोयाबीन तेल१३७००
मूग५८००करडी तेल२१ हजार

हेही वाचा : Health Benefits Of Garlic : निरोगी शरीराचा आरोग्य मंत्र; लसूण आहे उत्तम आरोग्याचा स्त्रोत

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्डजालनामराठवाडा