Join us

चालू गळीत हंगामासाठी उसाला राज्यातील सर्वाधिक पहिली उचल जाहीर, पंचगंगांकडून प्रतिटन 3300 रुपये भाव 

By गोकुळ पवार | Published: November 26, 2023 2:47 PM

पंचगंगाने चालू गळीत हंगामासाठी उसाला राज्यातील सर्वाधिक प्रतिटन 3300 रुपये पहिली उचल जाहीर केली.

Kolhapur : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याने (रेणुका शुगर्स लि.) चालू गळीत हंगामासाठी उसाला (Sugarcane) राज्यातील सर्वाधिक प्रतिटन 3300 रुपये पहिली उचल जाहीर केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्याला यश आले असून पंचगंगा'ने पहिली उचल जाहीर केल्याने जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांची कोंडी झाली आहे. त्यांची एफआरपी  3195 रुपये होते, त्यापेक्षा 105 रुपये जादा उचल दिली आहे. त्यामुळे आता कारखान्यांमध्ये दराची स्पर्धा सुरू होणार असल्याचे चित्र आहे. 

"स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 400 व चालू हंगामातील उसाला 3500 रुपये पहिली उचलीची मागणी करत दोन महिने आंदोलन केले. मागील हंगामासाठी 50 व 100 रुपयांवर तडजोड झाली. त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात सुमारे 100 कोटी पडले. आता चालू हंगामात प्रत्येकाने एकरकमी पहिल्या उचलीची घोषणा केली आहे. पंचगंगा साखर कारखान्याची चालू हंगामातील एफआरपी सरासरी 3195 रुपयांपर्यंत बसते, मात्र त्यांनी 3300 रुपये उचल जाहीर करून साखर उद्योगात खळबळ उडवून दिली आहे. एफआरपीपेक्षा तब्बल 105 रुपये जादा देऊन राज्यात सर्वाधिक दर देण्याचा विक्रम केला. 

कार्यक्षेत्रातील ऊस थांबवणे मुश्कील यंदा उसाचे उत्पादन कमी असल्याने साखर कारखाने जेमतेम 3 महिने चालणार आहेत. त्यामुळे आपापले गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करताना कारखानदारांची दमछाक होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या कार्यक्षेत्रात घुसून उसाची पळवापळवी होणार, हे निश्चित आहे. त्यात ज्याचा दर अधिक त्याच्याकडेच शेतकऱ्यांचा ओढा राहणार असल्याने कार्यक्षेत्रातील ऊस थांबवणे मुश्किल होणार आहे. तर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील म्हणाले, श्री रेणुका शुगर्सने चालू गळीत हंगामात गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन 3300 रुपये देण्यास मंजुरी दिली आहे. हा दर राज्यातील व कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी आहे. दरवर्षी उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. चालू वर्षी गळीत हंगामाचा कालावधी कमी आहे. तरी शेतकऱ्यानी सर्व ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे.

खासगी कारखान्यांना जमतं, मग ....

पंचगंगा कारखाना रेणुका शुगर्सने भाड्याने चालवण्यासाठी घेतला. कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 12.86 टक्के आहे. त्यामुळे त्यांची चालू हंगामातील एफआरपी 3195 रुपये बसते. त्यांनी शंभर रुपये जादा दिले. खासगी कारखान्यांना जमतं, मग सहकारी कारखान्यांना का जमत नाही? असा सवाल शेतकरी करत आहेत. एकीकडे रेणुका शुगर्सने 3300 रुपये जाहीर केले, मग दालमिया' मागे का? त्यांची एफआरपी सरासरी 3284 रुपये आहे, त्यांनी 3400 रुपये जाहीर करावा. यासाठी त्यांच्या दारात जाऊन बसणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :ऊसकोल्हापूरसाखर कारखाने