अकोला : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील(APMC) व्यवहार गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरेदीदार व गाडी ओढणाऱ्या मजुरांमध्ये कामकाजाच्या पद्धतीवरून वाद असल्याने बाजार समितीतील व्यवहार बंद असून, यात शेतकरी वेठीस धरला जात आहे.
बुधवार (८ जानेवारी) रोजी बाजार समितीत शुकशुकाट दिसून आला. प्राप्त माहितीनुसार, बाजार समितीत कार्यरत असलेले गाडी ओढणारे मजूर व खरेदीदार यांच्यात कामकाजाच्या पद्धतीसंदर्भात वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजार समितीमधील व्यवहार ठप्प पडले आहेत.
अद्यापही या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्याने बाजार समितीतील व्यवहार सुरू होण्याचे चिन्हे दिसून येत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून बाजार समिती बंद पडण्याचे प्रकार वाढत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. मंगळवार(७ जानेवारी)पासून बाजार समितीतील व्यवहार बंद आहेत. त्यामुळे कोट्यावधींचे व्यवहार रखडले आहेत.
बाजार समितीतील व्यवहार बंद पाडण्याचे प्रकार वाढले!
• काही दिवसांपासून बाजार समितीतील व्यवहार बंद पडण्याचे प्रकार वाढले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये व्यापाऱ्यांकडून दरवाढ न झाल्याने हमाल कामगार संघटनेकडून बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झाले होते.
• आता पुन्हा खरेदीदार व गाडी ओढणाऱ्या मजुरांमध्ये कामकाजासंदर्भात वाद झाल्याने व्यवहार पुन्हा बंद पडले आहेत. त्यामुळे शेतकरी वेठीस धरला जात आहेत. लिलाव पद्धत बंद पाडण्यासाठी असे प्रकार वाढल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
खरेदीदार व मजुरांमध्ये वाद असल्याने बाजार समितीतील व्यवहार बंद पडले आहेत. यासंदर्भात बाजार समिती प्रशासनाकडून खरेदीदार व मजुरांना पत्र पाठवून त्वरित तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. - सुनील मालोकार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला
हे ही वाचा सविस्तर : Akola APMC : हमाल दरवाढीचा मुद्दा ऐरणीवर; 'डीडीआर' कडे प्रस्ताव वाचा सविस्तर